पुणे : दिवसेंदिवस तोट्याच्या गर्तेत लोटल्या जात असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) दोन्ही महापालिकांकडून मिळणारी संचलन तूट आता वेळेत आणि पूर्ण मिळणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून मिळणारा निधी वेळेत न मिळाल्याने पीएमपीला इतर देणी देण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा निधी देण्यात येणार असल्याचे आयुक्त कुणाल कुमार यांनी शुक्रवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे. दोन्ही महापालिकांकडून हा निधी अर्धवट दिला जात असल्याची माहिती ‘महापालिकांकडून पीएमपीची आर्थिक कोंडी’ या वृत्ताद्वारे ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. राज्य शासनाने फेब्रुवारी २०१३ मध्ये दोन्ही महापालिकांनी पीएमपीला वार्षिक संचलन तूट ६० : ४० अशा स्वरूपात द्यावी, असा आदेश दिला. मात्र, ती अनियमित स्वरूपात आणि वर्षाच्या शेवटी देण्यात येत असल्याने एवढी मोठी रक्कम देण्यास सदस्यांकडून विरोध केला जात होता. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दोन्ही महापालिकांना विनंती करून संचलन तूट दोन्ही महापालिकांनी समान १२ हप्त्यांमध्ये द्यावी, असा ठरावही केला. तसेच, समान हप्त्यांमध्ये ही रक्कम देण्यात येत आहे. मात्र, ती देताना, ठरल्याप्रमाणे पूर्ण रक्कम न देता ही रक्कम अर्धवट स्वरूपात दिली जात आहे.पीएमपीची २०१४-१५ ची संचलन तूट १६७ कोटी रुपयांची आली आहे. त्यानुसार, १०० कोटी पुणे महापालिकेने, तर ६७ कोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेने देणे आवश्यक आहे. ही रक्कम दोन्ही महापालिकांनी १२ समान हप्त्यांमध्ये देण्यास मान्यता दिली. त्यानुसार, पुणे महापालिकेने दरमहा ८ कोटी ३८ लाख, तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने ५ कोटी ५९ लाखांचा हप्ता निश्चित केला. मात्र, पुणे महापालिकेकडून ५ कोटी २५ लाख, तर पिंपरी महापालिकेकडून ५ कोटींचाच हप्ता प्रत्यक्षात दिला जात होता. दोन दिवसांपूर्वी पीएमपीने थकीत रक्कम न दिल्याने भाडेकराराने वाहने पुरविणाऱ्या ठेकेदारांनी अचानक बंद पुकारला होता. त्यावर अधिकारी, तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही महापालिका नियमितपणे निधी देत नसल्याने इतर बिले अडचणीची ठरतात. त्यामुळे ही पालिकांना ठरल्याप्रमाणे संपूर्ण रक्कम द्यावी, अशी मागणी पीएमपी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. त्यानुसार, पुढील महिन्यापासून ही रक्कम ठरल्याप्रमाणे देण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले. तर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पीएमपीला संपूर्ण रक्कम दिली जाईल, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पीएमपीला मिळणार पूर्ण अनुदान
By admin | Updated: October 4, 2015 03:55 IST