पुणे :पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या. सन्मानजनक जागा न मिळाल्याने शिंदेसेनेने भाजपबरोबरची युती शहरात तोडली. त्यानंतर शिंदेसेनेने स्वबळावर ११९ जागा लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर शिंदेसेनेचा हा स्वबळाचा निर्णय तारणार का असा सवाल उपस्थित केला जात होता. शुक्रवारी महापालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर स्वबळाचा नारा शिंदेसेनेला जड गेल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. पुण्यात शिंदेसेनेला खातेही उघडता न आल्याने पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह नेत्यांना आत्मपरीक्षणाची वेळ आल्याचे बोलले जात आहे.
राज्यात भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) असे महायुतीचे सरकार आहे. पुण्यातदेखील भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केले होते. त्यानंतर शिंदेसेनेने भाजपकडे ३५ जागांची मागणी केली होती.
पण, भाजपने प्रत्यक्षात १५ जागा देण्याची तयारी दर्शवली. सन्मानजनक जागा मिळत नसल्यामुळे शिंदेसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ११९ जागांवर शिंदेसेनेने शहरात उमेदवार दिले.
जास्तीत जास्त उमेदवार शिंदेसेनेचे निवडून यावेत यासाठी शिंदेसेनेचा सोशल मीडिया सेल, शहरातील नेते जोरात कामालादेखील लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभांचे देखील शहरात आयोजन करण्यात आले होते. असे असताना देखील शिंदेसेनेला भोपळाही फोडता न आल्याने मतदारांनी शिंदेसेनेच्या एकला चलो रे च्या भूमिकेला नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे. युतीमध्ये लढले असते तर किमान शिंदेसेनेच्या काही जागा निवडून आल्या असता असे चित्र शुक्रवारी दिसून आले.
या निकालातून शहरातील मतदारांनी स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद, विश्वासार्ह उमेदवार आणि स्पष्ट राजकीय भूमिका यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले. स्वबळाचा निर्णय घेताना जमिनीवरील वास्तव, पक्षाची स्वतंत्र मतपेढी आणि कार्यकर्त्यांची ताकद यांचा योग्य अंदाज न आल्याचे निकालावरून स्पष्ट होते. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने शिंदेसेनेला शहरातील नेतृत्व, संघटना आणि युतीचे राजकारण यावर नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Web Summary : Shinde's Sena's solo run in Pune's election failed miserably after breaking alliance. BJP offered only 15 seats, deemed disrespectful. Contesting 119 seats independently resulted in zero wins, prompting introspection within the party.
Web Summary : पुणे में गठबंधन तोड़ने के बाद शिंदे सेना का स्वतंत्र रूप से चुनाव लड़ना विफल रहा। बीजेपी ने सिर्फ 15 सीटें दीं, जिसे अपमानजनक माना गया। 119 सीटों पर अकेले लड़ने से शून्य जीत मिली, जिससे पार्टी में आत्मनिरीक्षण की आवश्यकता हुई।