लोकमत न्यूज नेट
जेजुरी: महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या सोन्याच्या जेजुरीतील खंडोबा मंदिरालाचा कळस आणि शिखर नव्या वर्षात सोन्याचा होणार आहे. या साठी आठ किलो सोने वापरले जाणार आहे. या सोबतच शहरात आरोग्यविषयक सुविधा उभारण्यात येणार आहेत. यात एमआरआय, सोनोग्राफी, सिटीस्कन, एक्सरे, प्रसूतिगृह, या सुविधा बरोबरच डायलिसीस फ्री महाराष्ट्र हा संकल्प राबविला जाणार आहे, अशी माहिती श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्त मंडळाने गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने कोरोना काळात केलेली कामे आणि नव्या वर्षातील नियोजित कामाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख विश्वस्त सॉलीसीटर प्रसाद शिंदे, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, संदीप जगताप, अॅड अशोकराव संकपाळ, तुषार सहाणे, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.
गेल्या दहा महिन्याच्या कोरोना संकटाच्या काळात औद्योगिक वसाहतीतील कामगार, गरीब अनाथ नागरिकांना दोन वेळेची अन्न्सेवा, गरीब कुटुंबियांना किरणा कीट, रुग्णालयाना पीपीई कीट, सॅनिटायझर, औषधे फवारणी, ससून रुग्णालयाला आयसोलेशन वार्ड साठी ५१ लक्ष रुपये असे एकूण पाऊने दोन कोटी रुपयांची सुविधा देवस्थानाने दिली. जेजुरी व परिसरात आरोग्याच्या आधुनिक सुविधा नसल्याने गोर गरीबाच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने ती टाळण्यासाठी आरोग्यविषयक एमआरआय, सोनोग्राफी, सिटीस्कन, एक्सरे, प्रसूतिगृह आदी आधुनिक सुविधा येत्या आठ ते दहा महिन्यात नाममात्र दरात भाविक आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सोबत डायलिसीस फ्री महाराष्ट्र ही संकल्पना नाममात्र दरात राबविणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्ती प्रमाणे जेजुरीगडावरील खंडोबा मंदिराचे शिखर व घुमट सोन्याचे करण्यात येणार आहे. यासाठी आठ किलो सोने वापरण्यात येणार आहे. हे सोने महाराष्ट्रातील भाविकांकडून देणगीच्या स्वरुपात स्वीकारले जाणार आहे. जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई मंदिराचे काम सुरु असून देवसंस्थानच्या वतीने ५७ लाख रुपये या कामासाठी देण्यात आले आहे. लवकरच मंदिराचे काम पूर्ण होणार आहे. जेजुरी शहरातील मुख्य मारुती मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरु करण्यात आले आहे. जेजुरीगडावर सुमार ४० लक्ष रुपये खर्च करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. या परीसराचे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे.
चौकट
जेजुरी गडावरील नरवीर उमाजी नाईक यांच्या पुतळा परिसरातील सुशोभिकरण, जुन्या घोड्याच्या पागेच्या जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह व जेष्ठ भाविकांसाठी विश्रांती गृह, समूह शिल्पा मागील मोकळ्या जागेत संरक्षक भिंत, तसेच कुलधर्म कुलाचार करण्यासाठी सुविधा, भव्य प्रसादालय आदी कामे सुरु करण्यात आली आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थित घेतला जाणार आहे.
राज्यातील अनेक भाविकांनी देवाच्या नावाने व देवसंस्थानच्या नावाने पूर्वीच्या काळात जमिनी दान केल्या आहेत. देवसंस्थानच्या दप्तरी केवळ ४० एकर जागेची नोंद होती. विश्वस्त मंडळाने अनेक ठिकाणी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेवून आणखी ४९ एकर जागेचा शोध घेतला आहे. चाकण येथे ११ एकर, सातारा गिरवी येथे, २२ एकर, लिंब सातारा साडेसात एकर, भुईंज येथे साडे सतरा एकर, तसेच सांगवी फलटण, तरंगवाडी, सणसर ,पिसर्वे येथे देवसंस्थानच्या नावे जागा असून अनेक ठिकाणी या जमिनी शेतकरी कसीत आहेत. या शेतकऱ्याकडून देवसंस्थानला उत्पन्न मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. असेही विश्वस्त मंडळाने सांगितले.
फोटो मेल केला आहे.
जेजुरी गड , खंडोबा