पिंपरी : महापालिकेच्या लेखा व वित्त विभागातील ५२ कोटींच्या बोगस उपसूचना बिल प्रकरणाला शुक्रवारी (दि.१०) वेगळे वळण मिळाले. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी या बिलांवर सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सह्या असल्याचा दावा केला होता; प्रत्यक्षात मात्र सत्ताधारी भाजपच्याच १२ नगरसेवकांच्या सह्या असल्याचे उघड झाले आहे. सह्या झाल्यानंतर दोन वरिष्ठ नेत्यांनी संबंधित उपसूचना घेण्याबाबत प्रशासनावर दबाव टाकल्याची माहितीही समोर येत आहे.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद नसताना उपसूचनेद्वारे कंत्राटदारांना एका रात्रीत ५२ कोटीची देयके अदा केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात मुख्य लेखा व वित्त संचालक प्रवीण जैन यांच्यावर थेट आरोप होत आहेत. मात्र या उपसूचनेवर भाजपच्याच १२ नगरसेवकांच्या सह्या होत्या. त्यांनी सह्या केल्यानंतर भाजपच्या दोन बड्या पदाधिकाऱ्यांनीही बिल अदा करण्यासाठी दबाव आणल्याचे बोलले जात आहे. हे पदाधिकारी नेमके कोण, याबाबत भाजपच्या गोटात खलबते सुरू झाली आहेत.
महापालिकेतील सूत्रांच्या मते, मार्चअखेरच्या ‘बिल क्लिअरन्स’दरम्यान काही विशिष्ट ठेकेदारांची देयके तातडीने सोडण्यासाठी लेखा विभागावर तसेच नगरसेवकांना सह्या करण्यासाठी दबाव आला होता. महापालिकेवर वर्चस्व ठेवण्याच्या भाजपमधील दोन गटांतील शह-काटशहातून हे प्रकरण पुढे आले आहे. हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित नसून भाजपमधील अंतर्गत गटबाजी, ठेकेदार लॉबीतील कुरघोड्या आणि नगरसेवकांवरील दबावाचे राजकारण उघडे पाडणारा ठरत आहे.
भाजपमधील गटतट चव्हाट्यावर
या प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत गटतट आणि नेतृत्वाबाबतचा संघर्षही समोर आला आहे. एका गटाकडून सर्वपक्षीय नगरसेवकांच्या सह्यांचा दावा केला जात असताना दुसऱ्या गटातून उपसूचनेवर फक्त भाजप नगरसेवकांच्या सह्या कशा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे चौकशीचा प्रकाशझोत आता सहीपासून सही करवून घेणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दबावापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
प्रवीण जैन सहा दिवसांच्या रजेवर
या प्रकरणात मुख्य लेखा व वित्त संचालक प्रवीण जैन यांच्यावर थेट आरोप होत असतानाच ते सहा दिवसांच्या रजेवर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सात दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याच्या मुदतीत या प्रकरणातील मुख्य अधिकारी अनुपस्थित राहणार असल्याने, चौकशी खरोखर सखोल होणार की वेळकाढूपणा होणार?, असा सवाल महापालिका वर्तुळात उपस्थित होत आहे.
बोगस उपसूचनेवर भाजपच्या या १२ नगरसेवकांच्या सह्या
१) अर्चना कारंडे
२) योगिता नागरगोजे
३) निखिल बोऱ्हाडे
४) विजय शिंदे
५) सुजाता बोराटे
६) सागर गवळी
७) सोनाली गव्हाणे
८) कुंदा भिसे
९) रवीना आंगोळकर
१०) शाम जगताप
११) पल्लवी जगताप
१२) आरती (फक्त सही, नाव नाही)
Web Summary : Pimpri-Chinchwad's 52 crore bogus bill scam involves BJP corporators' signatures and alleged pressure from senior leaders. Internal BJP conflicts surface, raising questions about financial irregularities and political influence. Key official goes on leave amid investigation.
Web Summary : पिंपरी-चिंचवड़ के 52 करोड़ के फर्जी बिल घोटाले में भाजपा पार्षदों के हस्ताक्षर और वरिष्ठ नेताओं से कथित दबाव शामिल है। भाजपा के आंतरिक संघर्ष सामने आए, जिससे वित्तीय अनियमितताओं और राजनीतिक प्रभाव के बारे में सवाल उठे। जांच के बीच मुख्य अधिकारी छुट्टी पर चले गए।