पिंपरी: चिंचवड येथील प्रसिद्ध चित्रकार मुकेश गिरीश प्रभुणे (वय ४९) यांचे शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई-वडील, एक भाऊ व बहीण असा परिवार आहे. प्रसिद्ध चित्रकार मुकेश प्रभुणे हे चिंचवडचे रहिवाशी आहेत. त्यांनी पुण्यातील भारती कला महाविद्यालयातून जी. डी आर्टचे पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केले होते. अतिशय शांत, थोडे अबोल पण अतिशय गुणी व्यक्तिमत्त्व व प्रतिभावान चित्रकार म्हणून ते ओळखले जात. त्यांनी चित्रकार राजा रविवर्मा व इतर चित्र खूप सुरेख रेखाटली होती. त्याचबरोबर चिंचवड येथे साकारणाऱ्या क्रांतीतीर्थ आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक राष्ट्रीय स्मारक उभारणीत कला दिग्दर्शन केले होते.
आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालविली. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांचे ते पुत्र होत. खगोल विश्व संस्थेचे प्रमुख मयुरेश प्रभुणे व जेष्ठ पत्रकार मनस्विनी प्रभुणे- नायक यांचे ते बंधू होत. प्रभुणे यांच्या पार्थिवावर दुपारी काळेवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली.