लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएचडी व एम. फिल अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठीचा (पेट) अभ्यासक्रम संकेतस्थळावर जाहीर केला आहे. येत्या आठ दिवसांत प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पीएचडी प्रवेश प्रक्रियेच्या नियमामध्ये मोठे बदल केले असून त्यानुसार पीएचडीची प्रवेश प्रक्रिया पार पाडली जात आहे. पेट परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर झाला आहे. यंदा पीएचडी प्रवेशाच्या जागा कमी असण्याची शक्यता असल्याने प्रवेशासाठी मोठी चुरस असणार आहे. पूर्वी पीएचडीचे गाइड निवृत्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करू शकत होते. मात्र, नव्या नियमानुसार गाइड निवृत्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नवीन गाइड शोधावे लागणार आहेत. त्याचबरोबर ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर विभाग नाही, तिथल्या प्राध्यापकांना यापुढे पीएचडीसाठी मार्गदर्शन करता येणार नसल्याचे यूजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळेही पीएचडी व एम. फिलच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. विद्यावेतन पूर्ववत सुरू राहणारपीएचडी व एम. फिलचा अभ्यासक्रम पूर्णवेळ करणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून दरमहा विद्यावेतन दिले जाते. या विद्यावेतनासाठी यूजीसीकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला निधी उपलब्ध करून दिला होता. यूजीसीने दिलेल्या निधीची मुदत मार्च २०१७ अखेर संपली आहे. मात्र तरीही विद्यापीठ फंडातून पीएचडीच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन पूर्ववत सुरू ठेवले जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.पेट परीक्षेची तारीख, परीक्षेच्या पात्रतेचे निकष, मार्गदर्शकांची यादी, विषयनिहाय रिक्त जागा, पीएच.डी. साठीचे केंद्र याबाबतची माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पीएचडी प्रवेश प्रक्रियेला आठ दिवसांत सुरुवात
By admin | Updated: May 29, 2017 04:20 IST