डॉ. कोल्हे म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने कर्ज उभारणी व भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मंजुरी दिल्यानंतर कोविडच्या संकटामुळे पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचे स्वप्न लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याहा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी यावा यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत होतो. मात्र, कोविडच्या संकटामुळे या प्रकल्पाला मंजुरी मिळण्यास विलंब होत होता. नुकतेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण पार पडले. सादरीकरण पाहिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अर्थसंकल्प सादर करताना पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिल्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली.
डॉ. कोल्हे म्हणाले की, आता हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करणार आहोत. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीचे (महारेल) व्यवस्थापकीय संचालक राजेश जैस्वाल यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते. या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांनी हा प्रकल्प आपल्याला करायचा आहे असे स्पष्ट करुन कॅबिनेटच्या मंजुरीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सेमी हायस्पीड रेल्वेमार्गावर चाकण येथे इंडस्ट्रीयल रॅक, तर नारायणगाव येथे कृषी उत्पादनांसाठी रॅकची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना तसेच खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील शेतमाल देशभरात पोहोचविण्यासाठी उपयोग होणार असल्याचे खासदार डॉ.कोल्हे यांनी सांगितले.
'लोहमार्गाच्या वाहतुकीमध्ये रस्ते वाहतुकी पेक्षा पाच पट ऊर्जेची बचत होते.या दृष्टीने देखील हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.जून महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रकल्पाचे सादरीकरण केले होते.पवार यांनी हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी हिरिरीने सकारात्मक पावलं उचलली आहेत.या प्रकल्पाच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदार संघाचा विकास करता येईल. हा प्रकल्प शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाहतूककोंडीची समस्या सोडविण्यासाठी कॉम्प्रिहेंन्सिव्ह मोबिलिटी प्लानच्या दृष्टीनेही दूरगामी परिणाम करणारा ठरेल.
- डॉ.अमोल कोल्हे
खासदार, शिरूर लोकसभा मतदार संघ