ग्रामस्थांनी घटना पोलिसांना कळवली. ग्रामस्थ आणि पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला, मात्र अंधार आणि पावसाचा फायदा घेत चोरटे चोरी करून पळाले.
पाटस परिसरात चोरट्यांनी थैमान घालण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. मध्यरात्री दोन वाजता येथील अशोक तुकाराम तोंडे ( रा. वाबळेवस्ती, पाटस ) यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून किचन रूमच्या दरवाजाची तोडफोड करत कपाटातील ९० हजार किमतीचा सव्वा दोन तोळे वजनाचा गंठण,२० हजार किमतीचा अर्धा तोळे वजनाचा वेल तसेच रोख रक्कम अकरा हजार असा एकूण १ लाख २१ हजारांचा ऎवज अज्ञात चोरट्यांनी चोरला.
तसेच छगन प्रभाकर लंवाड (रा. वाबळेवस्ती, पाटस ) यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरात पत्र्याच्या पेटीत ठेवलेला एक तोळा वजनाचे सोन्याचे गंठण तसेच अर्धा तोळे वजनाचे सोन्याचे कानातील फुले असा एकूण ६० हजार किमतीचा ऎवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत दोन्ही घरमालकांनी पाटस पोलीस चौकीत चोरीची फिर्याद दिली आहे.
दरम्यान, वाबळे वस्ती परिसरात चोरटे आल्याची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे उपपोलीस निरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलीस हवालदार संजय देवकाते, पोलीस नाईक घनश्याम चव्हाण,पोलीस शिपाई समीर भालेराव दत्तात्रय टकले आदींनी घटना स्थळी धाव घेतली. घरफोडी झालेल्या घरांची पाहणी केली.दरम्यान घटना स्थळी ठशे तज्ज्ञ आणि श्वानपथकास पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.