दीपक जाधव / पुणे आगामी महापालिका निवडणुकीमध्ये निम्म्या जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी पुरुष उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. तिथे आता किमान आपल्या सौभाग्यवतीची वर्णी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. बायकोचा जातीचा दाखला काढण्यासाठी तिच्या मूळ गावी धाव घ्यावी लागत आहे, त्याचबरोबर तिच्या कुटुंबीयांची वंशावळ गोळा करणे, क्रिमिलेयर सर्टिफिकेट काढणे अशा बाबींची पूर्तता करताना नवरोबांची चांगलीच धांदल उडते आहे.आगामी २०१७च्या महापालिका निवडणुकीची प्रभागरचना व आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. एकूण १६२ जागांपैकी ८१ जागा महिलांसाठी राखीव असणार आहेत. त्यापैकी अनुसूचित जातींच्या महिलांसाठी ११, अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी १, तर इतर मागास प्रवर्गाच्या महिलांसाठी २२ जागा राखीव आहेत. महिलांच्या सर्वसाधारण गटासाठी ४७ जागा आरक्षित असणार आहेत.चार सदस्यीय प्रभागांमध्ये पडलेल्या आरक्षणांमुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या तिकिटावर बायकोची वर्णी लावण्याचा चंग बांधला आहे. काही ठिकाणी प्रभागातील एका खुल्या जागेसाठी दोन-तीन सक्षम उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाल्याने मधला मार्ग म्हणून घरातील महिलेला उभे करण्याचा पर्याय पुढे केला जात आहे. त्यामुळे ऐनवेळी बायकोला उभे करावे लागू शकेल या शक्यतेने त्यांच्याही सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ठेवली जात आहे. त्यामध्ये जातीचा दाखला मिळविण्यासाठी सर्वाधिक कसरत करावी लागत आहे. लग्नानंतर ती महिला संपूर्णपणे सासरची झाली असली तरी तिची जात बदलली जात नाही. जन्माने मिळालेली ही जात लग्न वा इतर कोणत्याही कारणाने बदलली जात नाही. जन्मजात मिळालेली जात ही मरेपर्यंत कायम राहते, धर्म बदलला तरी जात बदलली जात नाही. त्यामुळे तिच्या माहेरच्या नावानेच जातीच्या दाखल्यासाठी तिच्या मूळ गावी जाऊन दाखला मिळवावा लागतोय. त्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. प्रभागातील बदललेल्या परिस्थितीमुळे आरक्षित जागेव्यतिरिक्तही खुल्या जागेवरून लढण्याचीही तयारी महिलांनी ठेवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची संख्या विक्रमी असण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीमध्ये प्रस्थापित राजकीय कार्यकर्त्यांच्या घरातील महिलेला प्राधान्याने उमेदवारी देण्यात आली. मात्र अनेक जागांवरून राजकीय पार्र्श्वभूमी नसतानाही महिला उमेदवार विजयी झाल्या आहेत. मागील महापालिका निवडणुकीमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या ७६ जागांव्यतिरिक्त खुल्या गटातून आणखी २ महिला निवडून आल्या होत्या.
सौभाग्यवतींच्या दाखल्यासाठी पतीदेवांची धांदल
By admin | Updated: October 14, 2016 04:57 IST