रांजणगाव सांडस : शिरूच्या पूर्व भागातील कुरुळी (ता. शिरूर) येथे दहशत माजवणारा बिबट्या अखेर मंगळवारी पहाटे जेरबंद झाला. त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी माणिकडोक निवारा केंद्रात नेले आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे दहशती खाली असलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शिरूरच्या पूर्व भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत होती. कुरुळी येथील विठ्ठल बोरकर यांच्या शेतात पाणी देणाऱ्या कामगाराला मंगळवारी सकाळी ८ वाजता ३ वर्षे वयाच्या मादी जातीच्या बिबट्याचा पाय कशात तरी अडकला असल्याचे दिसले. येथील सुनील खांडेकर यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. परिसरात बिबट्या असल्याचे माहिती कळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाचे अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी माणिकडोह बिबट निवारण केंद्राच्या पथकाला तत्काळ पाचारण केले. बिबट्याच्या जवळ जाताना तो मोठ्या डरकाळ्या फोडत होता. या वेळी डॉ. निखिल बनगर, वन्यजीव पशुवैद्यक यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देण्यात आले. तब्बल २० मिनिटांनंतर बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर त्याला उचलून नेत जाळीत सोडण्यात आले. अडकलेल्या बिबट्याला तब्बल तीन तासांच्या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बेशुद्ध करून सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले. यावेळी सुनील खांडेकर, आबासाहेब देशमुख यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना विशेष सहकार्य केले. वन्यजीव पशुवैद्यक डॉ. निखिल बनगर, पशुवैद्यकीय सहायक महेंद्र ढोरे,आकाश डोळस, वैभव नेहरकर,वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर,वनपाल प्रवीण क्षीरसागर,वनरक्षक संजय पावणे,संतोष जराड,विशाल चव्हाण,बबन दहातोंडे,नवनाथ गांधले,गोविंद शेलार,सुधीर शितोळे,अभिजित सातपुते आदी या रेस्क्यु मोहिमेत सहभागी झाले होते. या बिबट्यावर शिरूर येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला माणिकडोह बिबट निवारण केंद्र येथे निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी सांगितले.
फोटो :
कुरुळी येथे वनविभागाचे अधिकारी बिबट्याला पकडून नेत असताना.