लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सणानिमित्त महिला अंगावर दागिने घालून जात असतील, तर त्यांना मंगळसूत्र चोरट्यांच्या सुळसुळाटामुळे दागिने सांभाळा, असा इशारा दिला जात असे. आता मंगळसूत्र चोरट्यांबरोबरच मोबाईल चोरट्यांची दहशत वाढली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जात असाल, तर मोबाईल सांभाळा असे सांगण्याची वेळ आली आहे.
शहरात सध्या गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरट्यांचा सुळसुळाट झालेला दिसून येतो. बसस्थानक, सांस्कृतिक कार्यक्रम, भाजी मंडई, राजकीय पक्षांची आंदोलने, कार्यक्रम, विवाह समारंभ, गर्दीचे रस्ते अशा ठिकाणाहून लोकांचे मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
गणेशोत्सवामुळे आता शहरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. त्याचा गैरफायदा हे मोबाईल चोरटे घेण्याची शक्यता आहे. पूर्वी लोकांच्या नकळत पाकीट मारले जायचे. आता त्याची जागा मोबाईलने घेतली आहे. त्यामुळे खरेदीसाठी आपण गर्दीच्या ठिकाणी जात असाल तर अगोदर मोबाईल सांभाळा.
गेल्या ७ महिन्यांत पुणे शहरातून तब्बल १३ हजार ८०० हून अधिक नागरिकांचे मोबाईल चोरीला गेले आहेत. पुणे पोलिसांच्या वेबसाईटवर ‘लॉस्ट अँड फाऊंड’ वर नागरिकांनी मोबाईल हरवल्याची नोंद केली आहे. त्यातील बहुतांश मोबाईल हे लोकांच्या नकळत चोरलेले असतात. मात्र, पोलीस असे गुन्हे दाखल करण्याऐवजी लोकांना 'लॉस्ट अँड फाऊंड'वर नोंद करायला सांगतात. लोकांनाही नवे सिमकार्ड घेण्यासाठी केवळ पोलीस तक्रारीची नोंद हवी असते. त्याचबरोबर तक्रार नोंदवून घेतली तरी पोलीस आपला मोबाइल शोधणार नाही, याचा नागरिकांना विश्वास असल्याने तेही वेबसाईटवर तक्रार करून मोबाईल चोरी विसरुन जातात. अशा प्रकारे शहरात दररोज साधारण ६५ मोबाइल चोरीला जात असतात. मात्र, त्यांची पोलिसांकडून हरविल्याची नोंद केली जाते.
शहराच्या उपनगरांमध्ये मोबाईल चोरीच्या घटना सर्वाधिक घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यात हडपसरमध्ये सर्वाधिक १ हजार ८१६, भारती विद्यापीठ परिसरात १ हजार ६४ आणि कोंढवा परिसरात ९०६ मोबाईल हरविल्याच्या तक्रारींची नोंद झाली आहे.