प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविल्यानंतर आता रेल्वे प्रशासन ऑक्सिजन प्लांटद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करून तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पुण्याच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये हा प्लांट तयार होणार आहे. मिनिटाला २५० लिटर ऑक्सिजनची निर्मिती केली जाईल. सुमारे ५० लाखाचा खर्च अपेक्षित आहे. येत्या १ ते २ आठवड्यात पूर्ण क्षमतेने हा प्लांट सुरू होणार आहे.
देशात ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाल्यानंतर रेल्वे बोर्डाने तत्काळ आपल्या सर्व विभागातील रेल्वे हॉस्पिटल प्रशासनाला ऑक्सिजन प्लांट संदर्भात प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले होते. पुणे विभागासह मध्य रेल्वेच्या सोलापूर, भुसावळ, नागपूर व मुंबई विभागाने या बाबत प्रस्ताव पाठविला. पुण्याच्या प्रस्तावला मंजुरी मिळाली आहे. या संदर्भात लवकरच टेंडर काढले जातील. ऑक्सिजन प्लांटसाठी जागादेखील निश्चित केली. रेल्वे बोर्डने लवकरात लवकर प्लांट सुरू करावे, असा आदेश सर्व झोनच्या सर व्यवस्थापकांना दिले आहे. त्यामुळे एक ते दोन आठवड्यात पुण्यातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू होईल, असे सांगितले जाते.
चौकट
प्रत्येक झोनमध्ये दोन ते तीन प्लांट
भारतीय रेल्वेचे देशात १७ झोन आहे तर एक कोकण कॉर्पोरेशन आहे. प्रत्येक झोन मध्ये दोन ते तीन ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे. मध्य रेल्वेमध्ये भुसावळ येते प्लांट सुरू झाला आहे. तर पुण्यात देखील एक ते दोन आठवड्यात सुरू होणार आहे. पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये कोविडसाठी ५० बेड व्यवस्था आहे. गरजेनुसार यात काही प्रमाणात वाढ देखील करता येईल. तर रोज सध्या ४० ते ४५ ऑक्सिजन सिलेंडरचा वापर रुग्णांसाठी केला जात आहे.
चौकट
५० हजार नागरिक पुणे हॉस्पिटलवर अवलंबून
पुणे रेल्वे विभागात जवळपास ९५०० कर्मचारी कार्यरत आहे. तर निवृत्त कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय असे मिळून जवळपास ४५ ते ५० हजार नागरिक पुणे रेल्वे हॉस्पिटलशी जोडलेले आहेत.
कोट
पुणे रेल्वे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी जागा देखील निवडली. यासाठी निविदा काढली. लवकरच ऑक्सिजन प्लांट सुरू केला जाईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे