जुन्नर: ऐतिहासिक स्थळे, धार्मिक स्थळे ,सांस्कृतिक परंपरा, दुर्गवैभव, निसर्गरम्य वारसा, वनसंपत्ती, जलसंपदा अशी मौलिक साधनसंपत्ती जुन्नर तालुक्याला लाभले आहे. तालुक्यात उद्योगधंदे, कारखान्यांना मर्यादा आहे. मात्र, येथे पर्यटनपूरक व्यवसायाला मोठ्या प्रमाणात संधी असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
शिवजयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालय व जुन्नर पर्यटन विकास संस्था,जुन्नर द्राक्ष उत्पादक संघटना, कृषी विज्ञान केंद्र नारायण गाव, कृषी विभाग
,पंचायत समिती जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने गोळेगाव येथे जुन्नर द्राक्ष महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले . या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, ऐतिहासिक वारसा असलेल्या तालुक्यात कृषी संस्कृती देखील मोलाची आहे. शिवजयंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना जुन्नर तालुक्यातील कृषी संस्कृतीची जाणीव व्हावी यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटन संचालनालय ,महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून द्राक्ष महोत्सवासाठी येणाऱ्या पर्यटकांची नोंदणी करण्यात आली होती. बैलगाडी सफर ,घोडेस्वारी, कॅम्प फायर, ट्रॅक्टर सफारी, पक्षी निरीक्षण, हेरिटेज वॉक ,किल्ले भ्रमण, आदिवासी नृत्य संस्कृती याचा अनुभव या निमित्ताने येणाऱ्या पर्यटकांना घेता आला. महाराष्ट्र पर्यटन संचालन याच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर, एमटीडीसीचे दीपक हरणे, जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे कार्यवाह जितेंद्र बीडवई,मनोज हाडवळे,यश मस्करे,
शिरीष भोर,शिरीष डुंबरे,राधाकृष्ण गायकवाड, संदीप वाघोले यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
२० जुन्नर द्राक्ष
द्राक्ष महोत्सवात बैलगाडी सफारीचा आनंद घेताना अमोल कोल्हे, अतुल बेनके, सत्यशील शेरकर.