पिंपरी : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यासाठी भारतीय सैन्यदल रात्रंदिवस सतर्क राहिले. प्रत्येक देशवासी सैन्यसोबत असून पिंपरी-चिंचवड शहरातील एका सात वर्षीय चिमुरड्याने त्याच्या वाढदिवसासाठी साठवलेले पैसे सैन्य दलास दिले आहेत. त्यामुळे या चिमुरड्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
निगडी प्राधिकरणातील आदिराज थोरात असे या चिमुरड्याचे नाव आहे. त्याचे वडील अमोल थोरात हे पिंपरी-चिंचवड शहर भाजपाचे प्रवक्ता आहेत. पुढील आठवड्यात आदिराज याचा वाढदिवस आहे. दरवर्षी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, सध्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये काही सैन्यातील काही जवानांना वीरमरण आले. तसेच पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याला सडेतोड उत्तर देत भारतीय सैन्याने मोठी कामगिरी दाखवली. त्यामुळे यंदा वाढदिवसासाठीचे पैसे भारतीय सैन्य दलासाठी देत असल्याचे चिमुरड्या आदिराज याने सांगितले.
आदिराज याने त्याच्या खाऊच्या पैशांचे गुलक (मनी बँक) पिंपरी-चिंचवडचे अपर तहसीलदार जयराज देशमुख यांच्यासमोर रिते केले. गुलकमध्ये १२०० रुपये निघाले. त्या रकमेचा धनादेश तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शासनाकडे हा धनादेश पाठविण्यात येईल. अशा पद्धतीने चिमुरड्याने देश आणि सैन्याबद्दल प्रेम, आदर व्यक्त करून सकारात्मक संदेश दिला आहे. यातून देशवासियांचे आणि सैन्याचे मनोबल उंचावण्यास मदत होईल, असे तहसीलदार देशमुख यांनी सांगितले.
भारत माता की जय...
माझ्या वाढदिवसासाठी मी पैसे साठवले होते. मात्र ते पैसे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सैनिकांना देत आहे, असे म्हणत आदिराज याने भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या.