Operation Sindoor - India Pakistan War Begins: पाकिस्तानवर भारतीय हवाई हद्दीत राहून तिन्ही सैन्य दलांनी जोरदार हवाई हल्ला केला आहे. यानंतर पाकिस्तानात पळापळ उडाल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हवाई हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील सर्व एअरबेस अलर्टवर ठेवले होते. यामुळे पहाटेच हवाई दलाची विमाने हवेत झेपावली होती. पुण्याच्या एअरबेसवरूनही लढाऊ विमानांनी पुणे, मुंबईच्या आकाशात घिरट्या घातल्या.
मध्यरात्रीपासून सकाळी सहा वाजेपर्यंत हा सराव सुरु होता. पाकिस्तानी हवाई दल हल्ला करण्याची शक्यता होती. यामुळे भारतीय हवाई दलाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. पुण्याच्या आणि मुंबईच्या आकाशात लढाऊ विमाने दिसत होती. तसेच विमाने उडतानाचा आवाज येत होता.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एअरबेसवरून लढाऊ विमानांचा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणावर सराव सुरु होता. पश्चिमेकडे लोणावळ्यापलिकडेपर्यंत तर पूर्वेकडे फलटणच्या पलिकडेपर्यंत ही लढाऊ विमाने नेमहीच सराव करतात. परंतू गेल्या काही दिवसांपासून हे प्रमाण वाढले होते. आज रात्री पुण्याच्या एअरबेसवरून पुणे आणि मुंबई या दोन्ही महत्वाच्या शहरांना संरक्षण पुरविण्यात आले.
भारतात नागरिकांना युद्धसज्जतेचे आदेश देत भारतीय संरक्षण दलांनी मिळून पाकिस्तानवर हल्ले चढविले आहेत. रात्री दोनच्या सुमारास भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळपास 9 ठिकाणी मिसाईलचा जोरदार वर्षाव केला आहे. पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आहे. भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.