बारामती : बारामती तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. तालुक्यातील ९९ पैकी २६ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त झाल्या आहेत. २४ ग्रामपंचायती हगणदरीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. १२ डिसेंबरपूर्वी तालुका पूर्णपणे हगणदरीमुक्त करणार असल्याचे गटविकास अधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले. तालुक्यात ५९ हजार ७२५ कुटुंबे आहेत. यापैकी ५०,८५३ कुटुंबांकडे शौचालये आहेत. २०१६-१७ मध्ये ५ हजार १४५ शौचालये पूर्ण करण्यात आली आहेत, तर ८ हजार ७९३ कुटुंबांकडे अद्यापही शौचालये नाहीत, तर तालुक्यातील ७९ कुटुंबे सार्वजनिक शौचालयाचा वापर करीत आहेत. येत्या १२ डिसेंबरच्या आत संपूर्ण तालुका हगणदरीमुक्त करण्यासाठी पंचायत समिती प्रशासन काम करीत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी काळे यांनी दिली. तालुक्यामध्ये २ आॅक्टोबरच्या आत शौचालय न बांधणाऱ्या कुटुंबांच्या प्रशासकीय सवलती बंद करण्याचे ठराव ग्रामपंचायतींमध्ये झाले होते. त्या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात तालुक्यात पूर्णपणे हगणदरीमुक्त झालेल्या ग्रामपंचायतींचे सत्कार पंचायत समितीच्या वतीने घेण्यात आले. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांचीच गावे मागे असल्याने त्यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अद्याप ४९ ग्रामपंचायती मागे आहेत. तालुक्यातील गुणवडी- ३५५, कारखेल- ३३९, कोऱ्हाळे- ५५४, मुढाळे- ४००, नीरावाघज- ५७९, पारवडी- ३३३, शिर्सुफळ- ४३० ही गावे अद्याप खूप मागे आहेत. यापैकी तालुक्यात नीरावाघज गाव हगणदरीमुक्तीमध्ये सर्वात मागे आहे.
बारामतीतील अवघी २६ गावे हगणदरीमुक्त
By admin | Updated: October 15, 2016 06:01 IST