पुणे : बिघडलेला टीव्ही दुरुस्त करण्याची बतावणी करत सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेला तब्बल १४ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२४ ते १ मार्च २०२५ कालावधीत वानवडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी ६५ वर्षीय महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला वानवडी परिसरात राहायला असून, घरातील टीव्ही नादुरुस्त झाल्यामुळे महिलेने संबंधित टीव्ही कंपनीला तक्रार करण्यासाठी नंबर मिळवला. त्यानंतर महिलेने संबंधिताला फोन केल्यानंतर सायबर चोरट्यांनी महिलेला टीव्ही दुरुस्त करून देण्याची बतावणी केली. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर लिंक पाठवून विश्वास संपादित केला. त्यांना लिंकमध्ये माहिती भरण्यास प्रवृत्त करत सायबर चोरट्यांनी तब्बल १४ लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने वर्ग करून घेतले. दरम्यान, बँक खात्यातून रक्कम कमी झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गोविंद जाधव करत आहेत.