पुणे : प्लास्टिक कचऱ्याचे विघटन हा सध्या चिंतेचा विषय बनला आहे. यावर सागरमित्र आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटरने ‘पी ४० के’ प्रकल्प हाती घेतला आहे. याअंतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे शंभर सोसायट्यांमधून वर्षभरात ४० हजार किलो प्लास्टिक संकलित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी प्लास्टिक पडलेले आढळते. नदी-नाल्यांमध्ये देखील प्लास्टिक फेकले जात असल्याने तेच जलस्रोतांमध्ये जाते. या प्लास्टिकमुळे जलचर व अन्य प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. याचा विचार करून शहरी सोसायट्यांमधला प्लास्टिक कचरा संकलित करून त्याचा पुनर्वापर करण्याचे उद्दिष्ट ‘पी ४० के’ प्रकल्पात ठेवण्यात आले आहे.
‘सागरमित्र’चे विनोद बोधनकर आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटरचे के. सी. गर्ग यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ते म्हणाले की, वर्षभरात किमान १०० सोसायट्यांमधून ४० हजार किलो प्लास्टिक संकलित केले जाणार आहे. आजमितीला दहा ते बारा सोसायट्या या प्रकल्पाशी जोडल्या आहेत. या सोसायट्यांकडून प्लास्टिक संकलित करून त्याचा पुनर्वापर केला जाईल.