पुणे : बँकेच्या खात्याचे व्यवस्थापन करणा-यासाठी नेमलेल्या व्यक्तीने खात्यातील १ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला.सुरज प्रकाश बरोले (वय ३७, रा. सेलीन पार्क, हांडेवाडी रोड, हडपसर) असे जामीन फेटाळण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाबू नामदेव वाकडकर (वय ६६, रा. वाकडकर वस्ती, गणेश मंदिरसमोर, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. बरोले हा एचडीएफसी बँकेत कामाला होता. त्यावेळी वाकडकर यांच्या खात्याचे कामकाज पाहत असत. वाकडकर यांच्या खात्यात मोठी रक्कम आहे, याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे त्याने वाकडकर यांचा विश्वास संपादन करून संंबंधित रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यासाठी त्यांच्याकड़ून काही चेकवर सह्या घेतल्या. मात्र ही रक्कम म्युच्युअल फंड न टाकता स्वत:च्या आणि नातेवाईकांच्या खात्यावर जमा केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येता वाकडकर यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार बरोले यांने वचनचिठ्ठी देवून सहा महिन्यांत पैसे देण्याचे मान्य केले होते. मात्र, पैसे न दिल्याने त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणातून जामीन मिळावा म्हणून त्याने अर्ज केला होता. त्यास वाकडकर यांच्यावतीने अॅड. सुचित मुंदडा आणि अॅड. योगिता वाळुंज यांनी विरोध केला. हा मोठा आर्थिक गुन्हा असून अपहारातील रक्कम जप्त झालेली नाही. आरोपीने रक्कमची विल्हेवाट कोठे लावली याचा तपास करणे बाकी आहे. जामीन मिळाल्यास आरोपी फरार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार त्याचा जामीन फेटाळण्यात आला. सरकारी वकील स्मिता चौघुले यांनी याप्रकरणी कामकाज पाहिले.
शेतक-याची सव्वा कोटींची फसवणूक : बँक कर्मचाऱ्याचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 20:12 IST
बँकेच्या खात्याचे व्यवस्थापन करणा-यासाठी नेमलेल्या व्यक्तीने खात्यातील १ कोटी १२ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळला.
शेतक-याची सव्वा कोटींची फसवणूक : बँक कर्मचाऱ्याचा जामीन फेटाळला
ठळक मुद्दे विश्वास संपादन करून संंबंधित रक्कम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा दिला सल्ला वचनचिठ्ठी देवून सहा महिन्यांत पैसे देण्याचे मान्य केले होते. मात्र, पैसे न दिल्याने त्याला अटक