जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या गडकोटातील फिरत्या गुप्त दानपेटीत पुन्हा जुन्या एक हजारांच्या सहा व पाचशेच्या चोवीस नोटा आढळून आल्या आहेत. एवढेच नव्हे, तर लहान मुलांच्या खेळण्यातील (बोगस) दोन हजार रुपये नोटांचा व पन्नास रुपये नोटांचा प्रत्येकी एक बंडल आढळून आला आहे. जुन्या एक हजार व पाचशे रुपयांची नोटाबंदी झाली असली तरी अजूनही गुप्त दानपेटीत जुन्या नोटा आढळून येत असल्याने या नोटांचे नेमके करायचे काय? असा प्रश्न व्यवस्थापनाला पडला आहे. यावर सहधर्मादाय आयुक्त पुणे यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर यांनी सांगितले.सोमवारी (दि. २९) गडकोट आवारातील फिरती गुप्त दानपेटी उघडण्यात आली. या वेळी सहधर्मादाय आयुक्त पुणे कार्यालयातील निरीक्षक कैलास महाले, विश्वस्त प्रसाद शिंदे, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर उपस्थित होते. या हुंडीतील रकमेची मोजदाद करण्यात आली असता त्यामध्ये सोने, चांदी, पितळ यांचे मूल्यांकन एकवट रक्कम ७ लाख ७७ हजार ९९३ इतकी भरली, मात्र गमतीची बाब अशी, की लहान मुलांच्या खेळण्यातील २ हजार व ५० रुपये नोटांचा प्रत्येकी एक बंडल आढळून आला आहे. शिवाय अजूनही नोटाबंदी झालेल्या एक हजाराच्या सहा व पाचशेच्या चोवीस नोटा आढळून आल्या आहेत. दानाबरोबरच भाविक पत्रांमधून घालतात देवाला साकडे देवा, खंडेराया बाप्पा सुखी ठेव, मनाची इच्छा पूर्ण करा माझे या वर्षी लग्न होऊ द्या! आणि सर्वांना सुखी ठेवा, असे साकडे एका मुलीने घातले असून तशा प्रकारचे पत्र गुप्त दानपेटीत मिळून आले आहे. घरातील अडीअडचणी, समस्या, निवारण करा, वडिलांची दारू सोडवा. नातू, मुलाला चांगले आरोग्य लाभू द्या, घरातील दु:ख, दारिद्र्य दूर करा, अशा अनेक प्रकारची पत्रे दानपेटीत आढळून येतात, ही पत्रे केवळ मराठीतूनच नव्हेत, तर गुजराती, हिंदी भाषेतून लिहिलेली दिसून येतात.
खंडेरायाच्या दानपेटीत पुन्हा आल्या जुन्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 02:41 IST