पुणे : देशातील इतर राज्यांच्या तुलनेने महाराष्ट्रातील औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांचे वीज दर २० आणि घरगुती ग्राहकांचे (३०० युनिट्स मासिक वापर असणारे ) दर २५ टक्क्यांनी जास्त आहेत. त्याचा खुलासा महावितरणला देण्यास भाग पाडावे, अशी मागणी सजग नागरिक मंचच्या वतीने वीज नियामक आयोगाकडे करण्यात आली आहे. महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच १०० युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान २५ ते तीनशे टक्के, १०१ ते ३०० युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांच्या मासिक वीजबिलात किमान दहा ते कमाल तीस टक्के वाढ होईल. या ग्राहकांसाठी ही वाढ फार मोठी असेल. त्यामुळे १०० युनिट वीज वापर असणाºया ग्राहकांच्या स्थिर आकारात कोणतीही वाढ करू नये. तसेच १०१ ते ३०० युनिट मासिक वीज वापर असणाºया ग्राहकांना स्थिर आकारात जास्तीत जास्त दहा टक्के वाढ करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. राज्यातील १ मेगावॅटच्या पुढे वीज वापर असणारे ग्राहक महावितरणच्या महागड्या आणि बेभरवशाच्या वीज सेवेमुळे ओपन अॅक्सेसकडे वळाले आहेत. त्यामुळे महावितरण कडून वीज घेत नसल्याने त्यांच्या स्थिर आकारात वाढ करणे चुकीचे आहे. एकीकडे केंद्र सरकार सौर उर्जेच्या वापरास प्रोत्साहन देत असताना महावितरणचा कारभार मात्र, ग्राहकांनी त्याकडे वळूच नये अशा प्रकारचा आहे. नेटमीटर महावितरणने मोफत बसवणे अपेक्षित आहे. परंतु, गेल्या तीन वर्षात शहरात १० हजारहून अधिक ग्राहकांनी रुफ टॉप सोलर यंत्रणा बसवली. त्यातील एकाही ग्राहकाला महावितरणने नेट मीटर दिलेला नाही. ग्राहकांना स्वत:च्या खर्चाने मीटर बसवावे लागले आहेत. त्यानंतरही महावितरणकडून योग्य बिल मिळायला चार महिने वाट पाहावी लागते. महावितरणच्या सेवेबाबत वाढत्या तक्रारी असताना त्यांना वीज दरवाढ का द्यावी असा सवाल सजग नागरीक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच, बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती वीज नियामक आयोगाकडे केली आहे.
वीज दरवाढी विरोधात हरकत : ढिसाळ सेवा असताना दरवाढीचो बोजा नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 20:50 IST
महावितरणने सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी स्थिर आकारामध्ये शंभर ते अडीचशे टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
वीज दरवाढी विरोधात हरकत : ढिसाळ सेवा असताना दरवाढीचो बोजा नको
ठळक मुद्देइतर राज्यांच्या तुलनेने वीज दर २० आणि घरगुती ग्राहकांचे दर २५ टक्क्यांनी जास्त बाजू मांडण्याची संधी द्यावी अशी वीज नियामक आयोगाकडे विनंती