पुणे : आम्ही मंडल आयोगाला आव्हान देऊ शकतो. जर आम्ही आव्हान दिले तर ओबीसींच्या मुलांचे नुकसान होईल. जे आम्हाला करायचे नाही. राजकीय हव्यासापोटी गरीब मुलांचे नुकसान करू नका, असे प्रत्युत्तर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या’, असे म्हणणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिले.
कुणबी असल्याच्या ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. या शासकीय नोंदींना कुणी आव्हान देऊ शकत नाही. सरकारने आमची फसवणूक केली नाही. जे असे म्हणत आहेत ते चुकीचे आहे. पंधरा दिवसांत मसुद्याचे कायद्यात रूपांतर होईल, असा दावाही जरांगे यांनी केला.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मनोज जरांगे-पाटील यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते. आजवर तिसऱ्यांदा मराठा आरक्षण रद्द केले आहे. कधी पुढच्या तर कधी मागच्या दारातून आरक्षणाला विरोध केला गेला आहे. प्रत्येक वेळी आकस धरावा असे नाही. पहिल्यांदा ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. या अधिकृत शासकीय नोंदी आहेत. सरकारने ३७ लाख कुणबी प्रमाणपत्रे दिली आहेत. त्यानुसार २ कोटी मराठा आरक्षणाचा लाभार्थी ठरत आहे. या जुन्या की नवीन नोंदी आहेत हे सरकार सांगत नाही. आमच्या मते नोंदी जुन्याच आहेत. पण त्या नव्याने सापडल्या आहेत. आता आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. कायद्यामार्फत सगेसोयरे प्रमाणपत्र मिळाले की पुन्हा एकदा महादिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच एक मोठी जाहीर सभाही घेतली जाणार आहे. असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
ज्या सवलती ओबीसी यांना मिळत आहेत त्या आम्हालाही मिळाव्यात. आम्ही झुंडशाहीने वागत नसून, केवळ आमचा हक्क मागत आहोत. कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच येत्या १० फेब्रुवारीपासून उपोषणास बसणार असल्याचेही जरांगे यांनी सांगितले.
पुस्तके नव्हे; माणसाच्या जीवनातल्या अडचणी वाचल्या
मी प्रथम नेतृत्व हाती घेतले नाही. मला नेतृत्व नको होते. मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. आंदोलन प्रामाणिकपणे केले पाहिजे अशी माझी भावना होती. मला कोणताही राजकीय वारसा नाही. येवल्यातला माणूस म्हणाला की मी पाचवी शिकलो आहे. सरकारने माझी सगळी माहिती काढली. मी बारावी शिकलो आहे. भलेही पुस्तके वाचली नसतील पण मी माणसाच्या दैनंदिन जीवनातल्या अडचणी वाचल्या आहेत, अशी भावना जरांगे यांनी व्यक्त केली.