सुषमा नेहरकर-शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भारताला प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळावी व पदके मिळवून देशाचे नाव उंचावण्यासाठी उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू तयार करण्यासाठी पुणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. चीन, जपान देशाच्या धर्तीवर पुण्यात क्रीडा नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये लहान वयातच म्हणजे ५ ते १२ वर्षे वयो गटातील मुलांना त्यांच्यातील खेळाडू ओळखून स्वतंत्र प्रशिक्षण देण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने सन २०१२ स्वतंत्र क्रीडा धोरण निश्चित करण्यात आले. यामध्ये लहान वयामध्येच मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासाठी व त्याच्यातील खेळाडू ओळखून त्या पद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र ‘क्रीडा नर्सरी’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या क्रीडा धोरणानुसार पुणे शहरातील पहिली ‘क्रीडा नर्सरी’ लवकरच सुरू होणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५ ते १२ वर्षे वयोगटातील सुमारे २० मुलांसाठी ही क्रीडा नर्सरी सुरू करण्यात येणार आहे. कात्रज येथे महापालिकेच्या जागेत प्रायोगिक तत्त्वावर ही पहिली क्रीडा नर्सरी सुरू करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
महापालिका सुरू करणार ‘क्रीडा नर्सरी’
By admin | Updated: May 9, 2017 04:13 IST