पिंपरी : जातीच्या दाखल्याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती, विद्यमान नगरसेवक जगदीश शेट्टी यांना विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.शेट्टी यांनी जातीच्या दाखल्याबाबत माजी खासदार गजानन बाबर यांनी तक्रार केली आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विभागीय जात पडताळणी समितीने शेट्टी यांना नोटीस बजावली आहे. ‘शेट्टी यांच्या शालेय पुराव्यावर जातीची नोंद हिंदू आहे. त्यांच्या भावाच्या शालेय पुराव्यावर हिंदू-शेट्टी अशी जातीची नोंद आहे. १९५०पूर्वीपासून महाराष्ट्रात रहिवासी असल्याचे सबळ पुरावे दाखल केलेले नाहीत. तसेच ते बंट जातीचे असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे लेखी खुलाशासह त्यांनी २० आॅक्टोबरला समिती क्रमांक तीन कार्यालयात उपस्थित राहावे,’ असे नोटिशीत म्हटले आहे. दरम्यान, दक्षता पथक चौकशी अधिकारी दीपाली भुजबळ यांनी ३० सप्टेंबरला समितीला अहवाल सादर केला आहे. त्यामध्येही चौकशीचा गोषवारा दिला आहे. त्यानुसार, शेट्टी यांच्या बंट जातीच्या दाखल्याची प्रत्यक्षात पडताळणी केली असून, दाखला संबंधित कार्यालयाने वितरित केला आहे. शालेय रजिस्टरवर जातीची नोंद हिंदू आहे. त्यांच्या भावाच्या शालेय पुराव्यावर हिंदू शेट्टी अशी नोंद आहे. या संदर्भात शेट्टी म्हणाले, ‘‘येत्या २० आॅक्टोबरला मला म्हणणे मांडण्यासाठी बोलावले आहे. यापूर्वी मी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. समितीने आणखी कागदपत्रे मागविल्यास त्यांची पूर्तता करू.’’ (प्रतिनिधी)
जात दाखल्याबाबत जगदीश शेट्टींना नोटीस
By admin | Updated: October 13, 2015 00:59 IST