-किरण शिंदे
पुणे :पुणे जिल्ह्यात बिबट्याच दर्शन होणं काही नवीन नाही. पुणे जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्या सर्रास दिसतो. नागरिकांना त्याचा दर्शन होतच असतं. मात्र जुन्नर तालुक्यातून एक असा काहीसा व्हिडिओ समोर आलाय की तो पाहून अंगाचा थरकाप उडेल. नारायणगाव येथील एका शेतकऱ्याच्या घराजवळ एक दोन नाही तर तब्बल तीन तीन बिबटे फिरताना दिसले आणि बिबट्याचा हा मुक्त वावर सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जुन्नर तालुक्यातील मानवी वस्ती असलेल्या परिसरात बिबट्या आल्याच्या यापुर्वी अनेक घटना घडल्या. अनेकदा तर बिबट्याने नागरिकांवर हल्ले देखील केले आहेत. मात्र तीन तीन बिबटे एकत्र फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मात्र दहशत पसरली आहे. या घटनेनंतर वनवभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
यावेळी तीन बिबटे एकत्र मुक्त वावर करताना दिसत आहेत. सुरुवातीला एक बिबट समोर येतोय आणि त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबटे येताना दिसत आहेत. हे तीनही बिबटे एकत्र पुढे जाताना दिसतात. नारायणगाव येथील जुन्नर नारायणगाव रोडवरील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या धनंजय दरंदळे यांच्या घराजवळचं हे दृश्य आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातून बिबट्या पळाला होता. मात्र त्याला वेळीच जेरबंद करण्यात आले आणि त्यानंतर पुणेकरांच्या जीवात जीव आला. परंतु त्या बिबट्याची दहशत संपलेली नसतानाच पुन्हा एकदा तीन-तीन बिबटे मुक्तपणे संचार करताना दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे तीनही बिबटे भक्षाच्या शोधात एकत्र फिरत असल्याचे सांगण्यात आले. मात्र तीन-तीन बिबटे अशा पकारे एकत्र फिरत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.