इंदापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालय येथे सार्वजनिक बांधकाम पशुसंवर्धन दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते तालुक्यातील पल्स पोलिओ लसीकरण याचा प्रारंभ रविवारी (दि. ३१) सकाळी ८ वाजता करण्यात आला. या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन खामगळ, इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, नगरसेवक अनिकेत वाघ, प्रा. अशोक मखरे, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, डॉ. सुहास शेळके, डॉ. विनोद राजपुरे, युवक नेते सचिन चौगुले, वसीम बागवान, ज्येष्ठ नेते दिलीपराव वाघमारे यांच्यासह इंदापूर नगरपरिषदेचे नगरसेवक उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.
पुढे बोलताना राज्यमंत्री भरणे म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांची संख्या ४४ आहे. सहकारी तत्त्वावर व खाजगी साखर कारखाने, यासाठी ऊसतोडणी मजूर आलेले आहेत. यांच्या बालकांची संख्या १३१४ आहे व इंदापूर शहरात २५ बूथवरती लसीकरण सुरू आहे. तर शहरातील बालक लाभार्थी संख्या ३ हजार ४१२ असणार आहे, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
तालुक्यातील आरोग्य कर्मचारी वाड्या, वस्त्यांवर जाऊन पल्स पोलिओ लसीकरण यासंदर्भात जनजागृती करतात. त्यामुळे ग्रामीण भागात देखील एकही बालक पल्स पोलिओपासून उपेक्षित राहत नाही. यातून देखील इंदापूर तालुक्यातील कोणत्याही भागातील बालक या लसीकरणापासून उपेक्षित राहिले असेल तर, ते तत्काळ आरोग्य विभागाला किंवा थेट मला कळवा, त्या बालकाला लसीकरण केले जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या वेळी ३९५ कर्मचाऱ्यांनी कोविडची लस दिलेली आहे. आरोग्य कर्मचारी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कोविडची लस पुरवली जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये थोडक्या कर्मचाऱ्यांना जरी लस दिली असली तरीदेखील दुसरा टप्पा सुरू होणार आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल, अशी माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
: संपूर्ण शारीरिक तपासणी यंत्राचे उद्घाटन
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीकरिता जिल्हा नियोजन निधीमधून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून संपूर्ण शरीर तपासणी यंत्र इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले असून, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक स्वप्नील राऊत, नगरसेवक अनिकेत वाघ यांच्या हस्ते यंत्राचे उदघाटन करून लोकार्पण करण्यात आले.
: इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाचा प्रारंभ करताना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व मान्यवर.