पुणे: जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वर्चस्वातून तीक्ष्ण हत्याराने वार करून खून करणा-या नऊ जणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याशिवाय सर्वांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंडही सुनावण्यात आला आहे.
विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी हा आदेश दिला आहे. स्वप्निल विजय भिलारे (वय 25), अनिल छबन खाटपे (वय 24), महेश दत्तात्रय वाघ (वय 28), स्वप्नील संभाजी खाटपे (वय 21, रा. भुकूम, ता. मुळशी), वैभव प्रभाकर शेलार (वय 23, रा. केडगाव, ता. दौंड), पप्पू गणेश उत्तेकर (वय 32, रा. मुठा, ता. मुळशी), राम बाळू केदारी (वय 24, रा. कोथरूड), हेमंत रमाकांत गोडांबे (वय 25) आणि सागर संभाजी गोळे (दोघेही, रा. पिरंगुट, ता. मुळशी) अशी शिक्षा झालेल्या नऊ जणांची नावे आहेत. एकनाथ बबन कुढले (वय 32, रा. खाटपेवाडी, भुकम) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा भाऊ काशिनाथ (वय 30) याने याबाबत पौड पोलिसात फिर्याद दिली होती. सहा वर्षांपूर्वी 1 डिसेंबर 2014 रोजी मुळशी तालुक्यातील भुकूम येथे ही घटना घडली होती.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील ऍड. विकास शहा यांनी काम पाहिले. त्यांनी 16 साक्षीदार तपासले. गुन्ह्याचा एकमेव प्रत्यक्षदर्शी असलेला फिर्यादी म्हणजे मृत्यू झालेल्याचा भाऊ काशिनाथ याची साक्ष, गुन्ह्यात वापरलेल्या हत्याराची केलेली जप्ती, शवविच्छेदन आणि रासायनिक विभागाचा अहवाल गुन्हा सिध्द करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल विजय चौधरी यांनी मदत केली. मयत एकनाथ जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असल्यामुळे व्यवहारातील फायद्यावरून एकनाथ आणि पाडुरंग मराठे यांच्यात वाद झाला होता. मराठे हा बाळू मारणेच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये तुरूंगात असल्याने त्याचा भाचा स्वप्निल भिलारे सर्व व्यवहार पाहत होता. जमीन व्यवहारातून मिळणारा फायदा आणि टोळीच्या वर्चस्वावरून त्या दोघात वाद होता. पिंटू मारणेच्या 2010 मध्ये झालेल्या खुनामध्ये एकनाथ आरोपी होता. त्यामुळे स्वप्निल त्याच्यावर चिडून होता. या सर्व कारणावरून एकनाथ याला ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. सर्व आरोपींना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. विकास शहा यांनी केली.
...