गराडे : सोनोरी (ता. पुरंदर) येथील सोनोरी उर्फ मल्हार गडाला शिवप्रतिष्ठान परिवार व सोनोरी, दिवे, काळेवाडी ग्रामस्थांच्या मदतीतून नवीन लाकडी दरवाजा बसविण्यात आला. भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव यांच्या हस्ते या दरवाजाचे उद्घाटन करण्यात आले. सोनोरी किल्ल्यावर भंडा-याची उधळण करीत डफ व तुतारीच्या निनादात तोफेतून फुलांचा वर्षाव करीत, सलामी देत शिवाजी महाराजांचा जयघोष करीत पालखी सोहळा मोठ्या उत्साहात हजारो गडप्रेमींच्या उपस्थित साजरा झाला.
छत्रपती शिवाजी महाराज, जिजामाता, जेजुरीचा खंडेराया सोबत म्हाळसा व बानु, सरदार, मावळे यांचा वेश परिधान केलेले कार्यकर्ते या पालखी सोहळ्यात सामील झाले होते. यामुळे पालखी सोहळ्याची रंगत वाढली. पालखी सोहळ्याचे नियोजन राजा शिवछत्रपती परिवाराने केले.
मराठेशाहीत अखेरचे बांधकाम झालेला किल्ला म्हणजे मल्हारगड होय. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इ. स. १७५७ ते १७६० या कालावधीत तोफखान्याचे प्रमुख माधवराव कृष्ण व भीमराव यशवंत पानसे या सरदारांनी हा किल्ला बांधला. किल्ला समुद्रसपाटीपासून ३,३०० फूट उंच आहे. या गडवरील तटबंदी काही ठिकाणी ढासळली आहे. गडाला शुक्रवारी नवीन दरवाजा बसविण्यात आला. हा किल्ला दुर्लक्षित होता. परंतु शिवप्रतिष्ठान परिवाराने गेल्या पाच वर्षांपासून १५० - २०० कार्यकर्त्यांच्या साहाय्याने गडावर येऊन अनेक कामे केली आहेत. यापुढेही गडावर मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात येणार असल्याचे शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सांगण्यात आले.
या वेळी भाजप नेते, बाबाराजे जाधवराव, माजी जि.प. सदस्या संगीता काळे, जालिंदर जगताप, सोनोरीचे माजी सरपंच सतीश शिंदे, अमृत भांडवलकर, अजित गोळे, दिवे ग्रामपंचायत सदस्य गुलाब झेंडे, योगेश काळे, सुजाता जगदाळे, श्रद्धा काळे तसेच रमाकांत काळे प्रदीप जगदाळे, गणेश काळे, किशोर काळे, सचिन काळे, रामभाऊ काळे, विलास काळे, राहुल काळे, अमित काळे, भारत मोरे, दत्ता मोरे आदी उपस्थित होते.
कोट
मल्हारगड हे ठिकाण पर्यटन क्षेत्र जाहीर व्हावे
मल्हारगड हे ठिकाण पर्यटन क्षेत्र जाहीर व्हावे. तसेच, दिवेघाट ते मल्हारगड असा रोपवे व्हावा. ऐतिहासिक घटनाक्रमाच्या माहितीसाठी गडावर साउंड अँड लाईटची व्यवस्था व्हावी यासाठी आपण लवकरच शासनाकडे प्रस्ताव दाखल करणार आहे.
- बाबा जाधवराव
फोटो : १) सोनोरी (ता. पुरंदर) येथील मल्हार गडावर शिवपालखीचे स्वागत करीत असताना बाबाराजे जाधवराव, सतीश शिंदे व इतर.
२) सोनोरी बाजूच्या गडाला लाकडी दरवाजाचे उद्घाटन बाबाराजे जाधवराव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी जमलेले शिवभक्त.