लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत
निवडणुकीत पराभव झाल्याच्या वादातून काही युवकांनी एकाच्या खुनाचा कट रचून गंभीर
मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी खुनाचा कट रचणाऱ्या
पराभूत महिलेवर देखील गुन्हा दाखल करत पाच जणांना अटक केली आहे. या सर्वांना
न्यायालयाने मंगळवार पर्यंत (दि.२३) पोलीस
कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.
शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सणसवाडी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत अजय दरेकर व सागर दरेकर यांची आई कल्पना दरेकर यांचा
रवींद्र दरेकर यांच्या वाहिनीने पराभव
केला होता. या पराभवाच्या रागातून कल्पना दरेकर या महिलेने तिची दोन मुले व त्यांचे
तीन साथीदारांना बरोबर घेऊन रवींद्र दरेकर हे त्यांच्या सणसवाडी येथील
कार्यालयात असताना अचानक अजय दरेकर, सागर
दरेकर, सुजित दरेकर, मृणाल दरेकर,
तुषार लांडगे आदींनी रवींद्र दरेकर
याचे कार्यालयात जाऊन रवींद्र यास लाकडी दांडके, लोखंडी
गज, पट्ट्याने बेदम मारहाण करत शिवीगाळ
दमदाटी केली. यात रवींद्र बबन दरेकर (वय ३४, रा. प्रगतीनगर, सणसवाडी, ता. शिरूर, जि.पुणे) हे गंभीर जखमी झाले. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर
पोलीस तपास करत असताना ग्रामपंचायत
निवडणुकीत झालेला पराभव पचनी न पडल्याने
पराभूत महिला व तिची दोन मुले आणि त्याच्या तीन
साथीदारांनी मिळून खुनाचा कट रचून सर्व
प्रकार केल्याचे समोर आले. पोलिसांनी कल्पना श्रीहरी दरेकर या
महिलेवर देखील गुन्हा दाखल केला असून अजय
श्रीहरी दरेकर, सागर श्रीहरी दरेकर, सुजित हिरामण दरेकर, मृणाल कैलास
दरेकर, तुषार ज्ञानेश्वर लांडगे (सर्व रा. सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक
केली.
चौकट : गंभीर गुन्हे करणारे होणार
तडीपार
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गंभीर
गुन्हे करणा-या गुन्हेगारांवर पुढील काळात
कठोर कारवाई करून त्यांना शिरूर
तालुक्यातून लवकर तडीपार करण्यात येणार
असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर
यांनी सांगितले आहे.
-उमेश तावसकर (पोलीस निरीक्षक)