लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पौड रोडवरील केळेवाडी येथे राहणारा ११ वर्षांचा मुलगा गेले दोन दिवस बेपत्ता होता. रविवारी दुपारी त्याचा मृतदेह घरापासून सुमारे ५०० मीटरवर आढळून आला. त्यामुळे केळेवाडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
विश्वजीत उर्फ विशु विनोद वंजारी ( वय ११, रा. केळेवाडी, कोथरूड) असे खून झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या आईवडिलांनी २९ जानेवारी रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. लहान मुलांची हरविल्याची तक्रार ही अपहरण म्हणून नोंद करून त्याचा तपास केला जातो. त्यानुसार कोथरूड पोलीस विश्वजीतचा तपास करण्यात येत होता. दरम्यान, रविवारी दुपारी त्याच्या राहत्या घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर दगडाखाली त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यावर मारहाण करण्यात आल्याचे दिसून येत होती. दगडाने त्याचा मृतदेह अर्धवट झाकून ठेवलेला दिसत होता. ही माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विश्वजीत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील लहान मुलांकडे चौकशी करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वजीत हा कुटुंबीयांसह केळेवाडी येथे राहत होता. तो २९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता खेळायला जातो, म्हणून बाहेर पडला तो परत आला नाही. विश्वजीत हा चौथीमध्ये शिकत होता. त्याची आई एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असून वडील सध्या काही काम करत नाही. त्याला मोठी बहीण व भाऊ असून तेही शिक्षण घेत आहेत.
पोलीस उपनिरीक्षक शेळके अधिक तपास करीत आहेत.
---