पुणे : राज्य लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. ही परीक्षा दि. १०, ११ आणि १३ ते १५ मे दरम्यान घेण्यात आली हाेती. यात मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीमध्ये अधीन राहून मुलाखतीस बोलविण्यात येत आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवश्यक मूळ प्रमाणपत्रांची पूर्तता मुलाखतीवेळी न केल्यास संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. त्याचबराेबर उत्तरपत्रिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे, अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्रोफाइलमध्ये प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांचा सविस्तर मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.