Supriya Sule on Manikrao Kokate: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा घोटाळ्याविषयी बोलताना धक्कादायक विधान केलं होतं. हल्ली भिकारीही एक रुपया घेत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला, असं विधान मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. यावरुन विरोधकांनी कृषीमंत्र्यांना धारेवर धरलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला त्यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटलं नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.
पीक विमा योजनेतल्या भ्रष्टाचारावरुन बोलताना कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी धक्कादायक विधान केलं होतं. कृषी विभागाच्या प्रदर्शनादरम्यान बोलताना मंत्री कोकाटे यांनी हे विधान केलं. हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली. ही योजना चांगली आहे. पण, या योजनेलाही गैरव्यवहाराचे ग्रहण लागले. यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही, पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत. ही योजना सरकारला कोणत्याही स्थिती बंद करायची नाही. त्यात सुधारणा करायची आहे, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं.
यावरुनच खासदार सुप्रिया सुळे यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. "मला त्यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही. कारण अनेकदा त्यांनी अनेक अशी विधानं केली आहेत. त्यांनीच म्हटलं की पीक विम्यामध्ये पाच हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. जर पाच हजार कोटींचा विमा घोटाळा झाला आहे तर त्यांनी त्यासंदर्भात काय कारवाई केली? तेच म्हणतात की केंद्र सरकारकडून निधी येत नाही. हे माझं विधान नाही तर राज्याच्या कृषीमंत्र्यांचे विधान आहे. आपल्या शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं ही दुःखाची गोष्ट आहे. हे सरकार महाराष्ट्रातच्या शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे हे यातून दिसून येतं," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
कृषिमंत्र्यांची सारवासारव
दरम्यान, शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर रोष निर्माण झाल्याने माणिकराव कोकाटे यांनी सारवासारव केली. “विरोधक माझ्या त्या वक्तव्यावर टीका करणारच कारण त्यांना तेवढी संधी पाहिजे. मी केलेलं वक्तव्य त्यांना तरी कळलं का?. मी म्हटलं की, एक रुपयांमुळे बाहेरच्या कंपन्यांचे गैरप्रकार वाढले. बाहेरच्या कंपन्यांनी त्यामध्ये ऑनलाईन अर्ज भरले. त्यामुळे एक रुपयात विमा स्वस्त असल्याने त्या कंपन्यांनी गैरफायदा घेतला. हा गैरफायदा घेऊ नये म्हणून विम्याच्या संदर्भामध्ये आम्ही पुनर्विचार करत आहे. पण माध्यामांनी माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवलं आणि लोकांनी चुकीचा अर्थ काढला," असं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटे यांनी दिलं.