राजेगाव : मलठण (ता. दौंड) येथील ‘समृद्ध जीवन’च्या प्रकल्पातील गाई-म्हशींचे तातडीने पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतर करा, असा आदेश पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दौंड न्यायालयाने दिला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. दरम्यान, या जनावरांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात दौंड न्यायालयात शासनाच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांत २९ जनावरे दगावल्याची नोंद पशुसंवर्धन खात्याच्या कार्यालयाकडे जरी असली तरी यापूर्वी शेकडो जनावरे चारा आणि पाण्यावाचून दगावली असल्याची वस्तुस्थिती आहे. ‘लोकमत’ने बुधवारी मलठण केंद्रातील जनावरे अन्नपाण्यावाचून तडफडून मरत असल्याचे वास्तव समोर आणले होते. तहसीलदार उत्तम दिघे, बारामती विभागाचे सहायक पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नराळे, निवासी नायब तहसीलदार प्रशांत बेडसे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, मंडल अधिकारी मोहन कांबळे, गावकामगार तलाठी जयंत भोसले, दीपक पांढरपट्टे आणि त्यांचे पथक दिवसभर या ठिकाणी तळ ठोकून होते.सहायक पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे म्हणाले की, या ठिकाणी गाई-म्हशींचे पालनपोषण करण्यासाठी कोणतेही प्रशासन उपलब्ध नसल्याने कोर्टाने तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांना आदेश दिला आहे की, ताबडतोब सदर जनावरे पांजरपोळ किंवा गोशाळेत स्थलांतरित करण्यात यावीत. शासकीय पातळीवर चारा उपलब्ध केला आहे.पेंढी आणण्याची तसदी घेतली नाहीमलठण येथील जनावरांच्या सुरक्षिततेचे प्रकरण मीडियाने उचलून धरल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. शिवाय, येथे दिवसभर स्थानिक ग्रामस्थ व दूरवरून येणाऱ्यांची गर्दी वाढली. काही जण तर सेल्फी काढून फोटो लोड करत होते; पण मदत म्हणून एखादी पेंढी चारा आणायचे धाडस कोणीही केले नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती.दोन दिवसांत २९ जनावरे दगावली तालुका पशुसंवर्धन अधिकारी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की, मंगळवारी २१, तर बुधवारी ८ जनावरे दगावली. तसेच, येथे ३0१ जनावरे शिल्लक आहेत. न्यायालयाने सदर जनावरे स्थलांतरित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. उद्या सकाळी भोसरी येथील पांजरपोळात संकरित गाई स्थलांतरित करण्यात येतील. एक-दोन दिवसांत म्हशी स्थलांतरित करण्यात येतील.जनावरांच्या मृतांची संख्या शेकडोंवरगेल्या काही दिवसांत सुमारे ३00 ते ४00 जनावरे दगावली आहेत; परंतु येथील कामगारांनी या जनावरांची परस्पर विल्हेवाट लावली असल्याचे परिसरात बोलले जात होते. शासनाकडे २९ जनावरे दगावल्याची नोंद असली, तरी वस्तुस्थितीत जनावरांच्या मृतांची संख्या शेकडोंवर आहे.
‘त्या’ जनावरांचे स्थलांतर करा
By admin | Updated: June 23, 2016 02:20 IST