प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात मुंबईतील रुग्णसंख्या धडकी भरवणारी होती. एका दिवशी २० हजार कोरोनाबाधितांचे निदान होऊ लागले. मुंबईतील रुग्णसंख्या ओसरू लागल्यावर आता पुणे जिल्हा पुन्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. सर्वात जास्त ओमायक्रॉनबाधितांची नोंदही पुण्यात झाली आहे.
राज्याच्या आरोग्य विभागाच्या २० जानेवारीच्या अहवालानुसार, पुणे जिल्ह्यात सध्या ७४ हजार सक्रिय रुग्ण आहेत. ठाणे जिल्ह्यात ५१ हजार तर मुंबईत २२ हजार सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी २८ टक्के रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. पुणे जिल्ह्यात कोरोना लाटेतील आत्तापर्यंतची एक दिवसातील सर्वाधिक १४ हजार ४२४ इतकी रुग्णसंख्या २० जानेवारी रोजी नोंदवली गेली. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रूपाने मुंबईतून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या सव्वा लाखापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर एक आठवड्याने पुण्यातील रुग्णसंख्या वाढू लागली. आणखी आठ-दहा दिवसांनी पुणे जिल्ह्यातील लाट ओसरू लागेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी संसर्ग सौम्य स्वरूपात असल्याचे दिसून येत आहे.
ओमायक्रॉनबाधितांची संख्याही पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. आत्तापर्यंत पुणे शहरात 865, पिंपरी-चिंचवड मध्ये 118 आणि पुणे ग्रामीणमध्ये 56 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक 865 इतके ओमायक्रॉनबाधित रुग्ण पुणे शहरात आढळून आले आहेत. त्या खालोखाल मुंबईमध्ये 687 रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वात कमी रुग्ण रायगड, वर्धा, भंडारा आणि जळगाव येथे असून येथील रुग्णांची संख्या प्रत्येकी एक इतकी आहे. पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतची ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 1039 इतकी झाली आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाट ओसरेल
''आंतरराष्ट्रीय संपर्क असलेले सर्वात मोठा प्रदेश असल्याने मुंबईतून तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. सक्रिय रुग्णसंख्या सव्वा लाखांपर्यंत पोहोचली. मुंबईतील लाट आता ओसरू लागली आहे. मुंबईनंतर आठ-दहा दिवसानी पुण्यातील रुग्णसंख्या वाढू लागली. पुणे सध्या रुग्णसंख्येचा उच्चांक अनुभवत आहे. लाट ओसरतानाही हाच पॅटर्न दिसून येईल. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाट ओसरू लागेल, असा अंदाज आहे. दक्षिण आफ्रिकेतही हा पॅटर्न पाच-सहा आठवडे पहायला मिळाला असल्याचे राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.''
जिल्हा एकूण बाधित सक्रिय
पुणे १२,९९,१११ ७३,०९८मुंबई १०,२२,७८९ २१,८३८ठाणे ७,३९,७८८ ५०,४५६
ओमायक्रॉनबाधित आकडेवारी
पुणे मनपा ८६५मुंबई ६८७पिंपरी चिंचवड ११८नागपूर ११६सांगली ५९पुणे ग्रामीण ५६