पुणे : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागून जखमी झालेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत. संतोष जगदाळे यांना या हल्ल्यात ३ गोळ्या लागल्या होत्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर आम्हाला न्याय मिळावा अशी त्यांनी मागणीही केली होती.
अखेर भारतीय सैन्य दलाने या पत्नींना न्याय मिळवून दिला. आणि ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून संयुक्त कारवाई करत मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास ९ दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केली. या ऑपरेशन सिंदूरचे संतोष जगदाळेंच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी अभिनंदन केले आहे. या दहशतवाद्यांचे तळ शोधून एक - एक दहशतवाद्याला मारावं अशी विनंती त्यांनी मोदी सरकारकडे केली आहे.
प्रगती जगदाळे म्हणाल्या, पहलगावला जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मी सौ प्रगती संतोष जगदाळे होते. म्हणजे कुंकवाचं महत्व हे प्रत्येक स्त्रीला किती असतं? हे कोणी बाकी समजू नाही शकत. हे प्रत्येक स्त्रीला जाणवत असते. तर त्या पहलगामच्या हल्ल्यानंतर माझं कुंकू पुसलं गेलं. त्या भ्याड दहशतवाद्यांनी माझं कुंकू पुसलं तिथे रक्ताच्या थारोळ्यात माझे पती संतोष जगदाळे पडले. ते शहीद झाले तिथे आणि त्यानंतर आज पंधरा दिवसानंतर मोदी सरांनी ऑपरेशन सिंदूर हे जेव्हा नाव दिलं. तेव्हा त्यांना जाणीव झाली की, आपल्या लेकींचं सिंदूर त्या भ्याड दहशतवाद्यांनी मिटवलं. तर त्याला सिंधूर नाव दिल्यानंतर त्यांना ती जाणीव राहणार आहे की, तुम्ही कोणाला मारलंय? माझ्या लेकीच्या नवऱ्यानं मारले. ही जाणीव प्रत्येक वेळेला त्या ऑपरेशन सिंदूरमधून त्यांना जाणवत आहे. तर ते जे नाव दिलंय त्यांनी आणि आता जो हल्ला करतायेत ते नऊ तळ्यांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. तो अतिशय योग्य आहे. आणि त्यांनी हा हल्ला आता थांबवू नये आणि दहशतवाद्याची तळ शोधून एक एक दहशतवादी मारावा. जसं त्यांनी आमच्या लोकांना मारलं तसं एकेकाला तसेच गोळ्यानी डोक्यात, छातीत हातपाय तोडून त्यांना मारावं. हीच आमच्या माझ्या पतीसाठी आणि जे कोणी तीस लोकं गेलेले आहेत. माझे पती त्यांचे मित्र संतोष यांच्याबरोबर अजून जे तीस लोकं गेलेत. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थी श्रद्धांजली होईल.