पुणे : कोरोना रुग्णांची लूट खासगी रुग्णालयांकडून अद्यापही सुरूच असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना झाल्यानंतर कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचारांकरिता दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या उपचारांपोटी रुग्णालयाने तब्बल नऊ लाख २० हजार रुपयांचे बिल आकारले. हे बिल पाहून नातेवाईकांनी ओळखीच्या कार्यकर्त्याकडे धाव घेतली. याबाबत पालिकेकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयाला योग्य बिल करण्याबाबत सूचना केल्या. कारवाईच्या भीतीने रुग्णालयाने अखेर साडेचार लाख रुपयांचे बिल कमी केले.
वाई येथे राहणाऱ्या ६० वर्षीय नागरिकाला कोरोनाची लागण झाली. नातेवाईकांनी त्यांना उपचारांसाठी कर्वे रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर २८ जानेवारीपासून १२ फेब्रुवारीपर्यंत उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या काळात उपचार करण्यासाठी १२ दिवसांचे सहा लाख आणि पुढील दोन दिवसांचे अडीच लाख तसेच औषधांचे ६० हजार असे एकूण ९ लाख २० हजार रुपयांचे बिल देण्यात आले. आधीच जवळच्या व्यक्तीचा मृत्यू आणि त्यातच आलेले वाढीव बिल यामुळे नातेवाईक हैराण झाले होते.
याबाबत मृताच्या मुलाने राष्ट्रवादी काँग्रेसचे पर्वती विधानसभा अध्यक्ष नितीन कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यांना वाढीव बिलाबाबत माहिती दिली. कदम यांनी पालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. मनीषा नाईक यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली. डॉ. नाईक यांनी खासगी रुग्णालयाशी संपर्क साधून बिल करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नियमबाह्य पध्दतीने बिलाची आकारणी केल्यास कारवाईचा इशारा दिला. रुग्णालयाने तत्काळ या रुग्णाच्या बिलामधून साडेचार लाख रुपये कमी केले. परंतु, बिल कमी करीत असताना रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने मात्र नातेवाईकांची कोणतीही तक्रार नसल्याचे आणि बिल कमी केले त्याबद्दल आभार मानत असल्याचे पत्र लिहून घेतले.