अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग अथवा इतर कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. एकट्या एमपीएससी परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून १५-१६ लाख विद्यार्थी अर्ज करत आहेत. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांवर मानसिक आणि आर्थिक ताण येत आहे. हे प्रत्येक विद्यार्थ्यांने गृहीत धरूनच अभ्यास करावा. कारण, केवळ एमपीएससी अथवा यूपीएससी म्हणजे सर्वकाही नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे किंवा करियर म्हणून इतर पर्याय वैकल्पिक ठेवणे गरजेचे आहे, असे मत पुण्यातील स्पर्धापरीक्षेचे मार्गदर्शन करणाऱ्या विविध संस्थाचालकांनी व्यक्त केले आहे.
स्वप्निल लोणकर या पुण्यातील फुरसुंगी येथील स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना दु:खदायक आहे. अभ्यास असो की आर्थिक अडचण किंवा परीक्षा पुढे ढकलली, तरी खचून न जाता मानसिक संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने ताण- तणावाच्या काळात समुपदेशन (कौन्सिलिंग) करून घ्यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नये, असे मत काही संस्थाचालकांनी व्यक्त केले.
---
स्पर्धापरीक्षेच्या जागा आता दर वर्षी कमी होत आहेत. जागा कमी आणि विद्यार्थी जास्त यामुळे प्रचंड स्पर्धा निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांने एमपीएससी, यूपीएससी व्यतिरिक्त इतर पर्याय तयार केले पाहिजे. नैराश्य आले तर संकोच न करता चांगल्या मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन घ्यावे. आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर अर्धवेळ नोकरी करूनही अभ्यास करता येऊ शकतो. त्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.
- निखिल नानगुडे, खासगी संस्थाचालक
----
काही विद्यार्थी आर्थिक परिस्थिती नसतानाही स्पर्धापरीक्षेच्या तयारीसाठी पुण्या-मुंबईकडे किंवा इतर मोठ्या शहरात येतात. वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांने तसे नियोजन करावे. अन्यथा, विनाकारण मग विद्यार्थी या चक्रव्यूहात अडकून पडतो. इतर वैकल्पिक पर्याय विद्यार्थ्यांनी निवडणे गरजेचे आहे.
- आय. पी. सिंह, खासगी संस्थाचालक
-----
स्पर्धापरीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी चांगले मित्र करायला हवेत. कारण अडचणीत, ताण-तणावाच्या वेळी आणि अभ्यास करतानाही खूप मोलाची ठरते. त्यामुळे आलेले नैराश्य देखील दूर होण्यास मदत होते. त्यामुळे कोणत्याही स्पर्धापरीक्षेची तयारी करताना फायदा होईलच. तसेच यशाची टक्केवारीही वाढेल.
- सचिन हिसवणकर, खासगी, संस्थाचालक
----
कोट
यूपीएससीप्रमाणेच एमपीएससीने देखील परीक्षांचे वेळापत्रक राबवणे गरजेचे आहे. केवळ घोषणा करून भागणार नाही. एका वर्षात पूर्ण प्रक्रिया पार पाडणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पाळली गेली तर विद्यार्थी यशस्वी होऊन लवकर बाहेर पडू शकतो. अन्यथा, या चक्रव्यूहात अडकून वय, पैसा, वेळ आणि शिक्षण या सर्व गोष्टी वाया जाईल.
- शिवाजी इंगवले, विद्यार्थी