आळंदी : डोक्यावर शिंदेशाही पगडी, अंगात भरजरी सदरा, कंबरेला पांढरा कद आणि चेहऱ्यावर पीळदार मिशी असा मराठमोळा शिंदेशाही साज देऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांची समाधी चंदनउटीचा साज देऊन साकारण्यात आली होती. यासाठी ११ किलो चंदनउटीचा वापर करण्यात आला होता. मराठी नूतन वर्षातील प्रथापरंपरांप्रमाणे गांधी कुटुंबीयांच्या वतीने माऊलींच्या संजीवन समाधीवर दर वर्षी गुढी पाडवा, रामनवमी, अक्षय तृतीया व नृसिंहजयंती या चार पवित्र, धार्मिक व मंगलमय दिनी चंदनउटीची सेवा ही गांधी कुटुंबीयांच्या कलाकुसरीने केली जाते. या वेळी समारे ११ किलो सुगंधी चंदनाचा वापर करून अतिशय सुरेख, रेखीव, मनमोहक असे रूप माऊलींच्या संजीवन समाधीवर साकारण्यात आले.शुक्रवारी दुपारी ठीक तीनपासून सायंकाळी सहापर्यंत गांधी कुटुंबीयांच्या वतीने माऊलींच्या संजीवन समाधीवर तीन तास परिश्रम घेऊन आजची दुसरी चंदनउटी पूर्ण करण्यात आली. सायंकाळी सहानंतर शिंदेशाही अवतार पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जमले होते. (वार्ताहर)
माऊलींना शिंदेशाही पगडीचा साज
By admin | Updated: April 16, 2016 03:46 IST