आळेफाटा : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याने शासनाने हे आरक्षण पूर्ववत करावे या मागणीसाठी आळेफाटा चौकात शनिवार (दि.१९) पुणे जिल्हा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले.
आळेफाटा चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जिल्हा अध्यक्ष नीलेश भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन कोरोना नियमांचे पालन करत करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य जीवन शिंदे, बाजार समिती संचालक आनंद रासकर, गोमाता दूधसंस्था अध्यक्ष अशोक गडगे, सौरभ डोके, मंगरूळ सरपंच देवराम खराडे, उदय पाटील भुजबळ, संजय पाटील भुजबळ, दत्तात्रय गडगे, नीलेश भुजबळ, सिद्धार्थ गडगे उपस्थित होते.
नीलेश भुजबळ म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थांमधील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात आलेले आहे. याचा परिणाम होत आहे. तर मंडल आयोग व घटना दुरूस्तीने ओबीसींना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे. हे आरक्षण कायदेशीर असून ते पूर्ववत करावे. पंचायत समीतीचे सदस्य शिंदे म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे. यामुळे कार्यवाही करून हक्काच्या आरक्षणाचे रक्षण करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल. यासंदर्भात निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तर आज मंडळाधिकारी राजेश ठुबे आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनाही निवेदन देण्यात आले.
फोटो : ओबीसी आरक्षण पूर्ववत करावे या मागणीचे निवेदन मंडळाधिकारी यांना देण्यात आले.