पुणे : महापालिकेत भाजपाची सत्ता एकहाती येणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने पुणे शहरात इतर विकासाची कामे करतानाच पुण्याला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा निश्चय भाजपाने केला आहे, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.कोरेगाव पार्क प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत खासदार काकडे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, उमेदवार नवनाथ कांबळे, लता धायरकर, मंगला मंत्री व उमेश गायकवाड यांच्यासह अभिजित वाकचौरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.भाजपा हा सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करणारा पक्ष आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सकारात्मक व विकासात्मक बदल घडविण्यासाठी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार काम करीत आहे. त्यामुळे पुण्यात भाजपा सत्तेत आल्यावर सामान्य माणसाचे जगणे सुंदर व सुसह्य होईल असा कारभार महापालिकेचा होईल, असेही खासदार संजय काकडे म्हणाले.सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, खासदार काकडे व मी गरीब कुटुंबातून आलो आहोत. तरीदेखील भाजपाने आम्हाला संधी दिली. सामान्य माणसासाठी काम करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. महापालिकेत भाजपा सत्तेत आल्यावर ते साध्य होणार आहे. त्यासाठीची सुवर्णसंधी मतदारांना मिळाली असून, त्यांनी भाजपाचे उमेदवार निवडून द्यावेत.(प्रतिनिधी)
पुणे झोपडपट्टीमुक्त करू
By admin | Updated: February 15, 2017 02:34 IST