बाणेर : मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो, बाणेर-बालेवाडी-पाषाण जे परिवर्तन घडवायचे आहे, जो विकास करावयाचा आहे, त्या विकासाची हमी मी तुम्हाला देतो. तुमच्यासाठी माझी तिजोरी उघडी राहील. आता खऱ्या अर्थाने या प्रभागात परिवर्तन करण्याची वेळ आली आहे. बाणेर-बालेवाडी-पाषाणमध्ये परिवर्तन घडवा, तुम्हाला विकासाची हमी मी देतो, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाणेर येथे केले.प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपाचे उमेदवार स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, अमोल बालवडकर, राहुल कोकाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, राज्यसभा खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, विजय काळे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष प्रकाश बालवडकर आदी व्यासपीठावर होते.फडणवीस पुढे म्हणाले, सुंदर व स्वच्छ परिसर असा बाणेर-बालेवाडीचा लौकिक आहे. विकासाची अधिक उंची गाठून या भागाला विकासाचे मॉडेल बनविण्याचा संकल्प आज मी तुमच्या साक्षीने सोडत आहे. पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय) अंतर्गत देशपातळीवर २०२२पर्यंत प्रत्येकास घर देण्याचा आमचा प्रयत्न असून या योजनेंतर्गत पुण्यात तब्बल ५० हजार घरे आम्ही बांधणार आहोत. यात बाणेर, बालेवाडी, पाषाण, सुतारवाडी भागातील गरीब वर्गासाठी सुमारे ५००० घरे आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. (प्रतिनिधी)
पाषाणमध्ये परिवर्तन घडवा
By admin | Updated: February 15, 2017 02:23 IST