पुणे : ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा!’ राज्याच्या भगव्या रंगाच्या नकाशाच्या पार्श्वभूमीवर अशी घोषणा छापलेले फलक शहरात लागले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता हिंदुत्वाच्या अजेंड्यावर काम करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. येत्या २३ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या मनसेच्या पहिल्याच अधिवेशनाची तयारी पुण्यात सुरू असून त्याअंतर्गत हे फलक लावण्यात आले आहेत.त्यावर राज ठाकरे यांचे बोट वर केलेले सर्वपरिचित छायाचित्र आहे. स्थानिक पदाधिकाºयांची लहान छायाचित्रं, तारीख व वेळ याशिवाय फलकावर काहीही मजकूर नाही. फक्त भगवा रंग, राज्याचा नकाशा व विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा या घोषणेलाच महत्त्व देण्यात आले आहे. कट्टर हिंदुत्वाबाबत आग्रही असलेली शिवसेना राज्यातील सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेल्यामुळे राज ही भूमिका घेतील असे बोलले जात होते. ते खरे ठरत असल्याचे या फलकांवरून दिसते आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे. मुंबईतील अधिवेशनाची तयारी पुण्यात सुरू असून, त्याच्या प्रचारासाठी हे फलक लावण्यात आले आहेत. या अधिवेशनासाठी पुण्यातून मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्याचा स्थानिक पदाधिकाºयांचा प्रयत्न आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, बाबू वागसकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रिटा गुप्ता यांनी गेल्या काही दिवसांत मनसेच्या पुण्यातील राज्य, जिल्हा तसेच तालुका व शहर पदाधिकाºयांच्या बैठका घेऊन त्यांना अधिवेशनाशी संबंधित सर्व माहिती दिली आहे.
मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:34 IST
‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा!’ : शहरात भगवे बँनर
मनसेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर शिक्कामोर्तब?
ठळक मुद्देयेत्या २३ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या मनसेच्या अधिवेशनाची तयारी पुण्यात सुरू