पुण्यातील खराडी येथील उच्चभ्रू परिसरात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून २.७० ग्रॉम कोकेन सदृश पदार्थ आणि ७० ग्रॉम गांजा सदृश पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी कोर्टात झाली. यातील आरोपींना पुणे कोर्टात हजर करण्यात आले. या प्रकरणातील आरोपींना पुणे कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
पुण्यातील रेव्ह पार्टीसंदर्भात फडणवीसांना विचारल्यानंतर ते म्हणाले की, "पुण्यातील खराडी भागात झालेल्या रेव्ह पार्टीबाबत आपल्याला अधिकची माहिती नाही. बिफ्रीग घेतल्यानंतर त्याची माहिती देता येईल. मात्र, सकाळपासून माध्यमातून जी माहिती मिळाली, त्यात पुणे पोलिसांनी छापा मारून काही ड्रग्ज, काही मद्य, काही अमली पदार्थ सापडली आहेत. पोलिसांनी मोठे ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त केले. याबाबत अधिकची माहिती मला नाही. मात्र, त्याची बिफ्रीग घेतल्यानंतर अधिकीची माहिती देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.
याप्रकरणी प्रांजल मनिष खेवलकर (वय, ४१), निखिल जेठानंद पोपटाणी (वय, ३५), समीर फकीर महमंद सय्यद (वय, ४१) सचिन सोनाजी भोंबे (वय,४२), श्रीपाद मोहन यादव (वय, २७) ईशा देवज्योत सिंग (वय, २२), प्राची गोपाल शर्मा ( वय, २३) या सात जणांना अटक करण्यात आली. शिवाय, आरोपींकडून १० मोबाईल हुक्कापॉट सेट व दारू आणि बियरच्या बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब) (11) अ, २१ (ब),२७कोटपा ७ (२), २०(२), प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. २९ जुलैपर्यंत आरोपी पोलीस कोठडीत राहणार आहेत.