लोणी काळभोर : शिरूर येथे ५ अनोळखी इसमांनी एकास ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने वार केला व त्यानंतर पिस्तुलाने पाठीमागून गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने पुणे उपनगर परिसरातील सात रेकॉर्डवरील गुन्हेगारांंना जेरबंद केले आहे.
सदर प्रकरणी गोपाळ ऊर्फ गोप्या संजय यादव (रा. पुणे), शुभम सतीश पवार (रा. पापडेवस्ती, भेकराईनगर, पुणे), अभिजित ऊर्फ जपानी कृष्णा भोसले (रा. भेकराईनगर, पुणे), शुभम विजय पांचाळ (रा. हडपसर, पुणे), निशांत भगवान भगत (रा. भेकराईनगर, फुरसुंगी, पुणे), आदित्य औदुंबर डंबरे (रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे), शुभम ऊर्फ बंटी किसन यादव (रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी प्रवीण गोकुळ गव्हाणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचेकडील मोटारसायकलवरून निर्माण प्लाझा ते बाबूरावनगर रोडने जात असताना दोन अनोळखी इसमांनी व्हिजन इंटरनॅशनल स्कूलच्या समोर गाडीने ओव्हरटेक करून फिर्यादीचे गाडीस आडवी गाडी मारून थांबवले तसेच पाठीमागून ड्यूक गाडीवरून आलेल्या तीन अनोळखी इसमांनी येऊन फिर्यादीस घेरून फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कोयत्याने फिर्यादीवर वार केला व पिस्तुलाने पाठीमागून गोळ्या झाडून खून करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यातील आरोपी गोपाळ ऊर्फ गोप्या संजय यादव व त्यासोबत असणारे अभिजित ऊर्फ जपानी कृष्णा भोसले यांना सासवड येथून ताब्यात घेऊन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता यादव याने फिर्यादीस जिवे ठार मारण्याकरिता आपल्या वरील साथीदारांना सुपारी दिली असल्याची माहिती दिली. त्यावरून इतरांना अटक करण्यात आली आहे. एन. के. साम्राज्य ग्रुपचे सदस्यांनी अत्याचार केलेबाबत काही तक्रारी असल्यास नागरिकांनी निर्भयपणे पुढे येऊन तक्रार द्यावी, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वतीने करण्यात आले आहे