पुणे : ‘पाण्याचा थेंबदेखील वाचवा’ असे आवाहन करणाऱ्या महापालिकेकडून मात्र शहरात रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. सुमारे ५० वर्षे जुन्या जलवाहिन्यांचे शहरातील जाळे जीर्ण झाले असून ‘वरून गाडी गेली’, ‘भराव खचला’, ‘पाण्याचा दाब वाढला’, ‘हवेचा दाब सहन झाला नाही’ अशा अनेक कारणांनी रोज किमान एक तरी जलवाहिनी फुटत आहे.शहराची व जुनी व नवी हद्द मिळून एकूण २ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या आहेत. मध्यभागातील अनेक जलवाहिन्या जुन्या म्हणजे थेट ५० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या सर्वच नव्याने टाकण्याची गरज आहे; मात्र त्यासाठी रस्ता पूर्णपणे बंद करावा लागेल. ते शक्य नसल्यामुळे जिथे जलवाहिनी फुटते तिथे जोड लावून गेली अनेक वर्षे काम भागवले जात आहे. मात्र आता या जलवाहिन्यांचे आयुष्यच संपले असून, पाणी किंवा हवेचे थोडेही प्रेशर त्यांना सहन होत नाही. त्यामुळेच त्या एकीकडे दुरुस्ती झाली की दुसरीकडे फुटत असतात.पालिकेचा पाणीपुरवठा विभागही यामुळे हतबल झाला आहे. जलवाहिन्या फुटण्याचे प्रमाण पूर्वी एकदम कमी होते. तसेच त्या वेळी पालिकेकडे स्वत:चा कर्मचारीवर्ग होता. त्यांची पेठ किंवा क्षेत्रनिहाय पथके तयार असत. तक्रार आली की त्वरित घटनास्थळी जाऊन काम सुरू होत असे. त्यातील बहुसंख्य कर्मचारी निवृत्त झाले. त्यानंतर कर्मचारीभरतीच झालेली नाही. त्यामुळे जलवाहिन्या दुरुस्तीचे काम आता पालिकेला ठेकेदारांकडून करून घ्यावे लागते आहे. ठेकेदाराने तक्रार आली की त्वरित काम करणे अपेक्षित असले तरी जलवाहिनी फुटीचे प्रकार वाढल्यामुळे काम करणे अवघड झाले आहे.एखादी जलवाहिनी फुटली तर ते काम युद्धपातळीवर करता येणे शक्य होते. मात्र सध्या रोजच एकापेक्षा अधिक जलवाहिन्या वेगवेगळ्या ठिकाणी फुटत आहेत. जलवाहिनी दुरुस्तीच्या ठिकाणी खोदकाम करायचे असेल तर त्यासाठी जेसीबी यंत्र लागते. ठेकेदाराचे दुसरीकडे काम सुरू असेल तर त्याला हे यंत्र त्वरित उपलब्ध होत नाही. त्यामुळे कामाला विलंब होतो. तेवढा वेळ जलवाहिनीमधून पाणी वाया जात असते. प्रत्येक ठिकाणी कर्मचारी नियुक्त करणे शक्य नसल्यामुळे एक काम संपल्याशिवाय दुसरे सुरू केले जात नाही.फायर हायड्रंटचा चुकीचा वापरआग लागल्यानंतर त्वरित पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मोठ्या जलवाहिन्यांवर प्रत्येक ५०० मीटरवर फायर हायड्रंट म्हणून एक व्हॉल्व काढलेला असायचा. त्याच्या नजीकच्या भिंतीवर लाल रंगात तशी अक्षरेही रंगवलेली असत.जलवाहिनीत कचरा आला किंवा पाणी, हवेचा दाब वाढला की हा व्हॉल्व सोडून त्याची आपोआप दुरुस्ती होत असे. मात्र, आता बऱ्याच ठिकाणी या व्हॉल्वलाच पाइप लावून त्यातून नियमितपणे पाणी घेतले जाते. पाणीपुरवठा विभागाने मध्यंतरी शहरात किती ठिकाणी जलवाहिन्यांची अवस्था नाजूक झाली त्याचे सर्वेक्षण केले. त्यात अशी तब्बल ५०० ठिकाणे आढळली आहेत. त्या सर्व ठिकाणच्या जलवाहिन्या तातडीने दुरुस्त करणे गरजेचे आहे. मात्र त्यासाठी रस्ते बंद करावे लागतील. ते शक्य नसल्यानेच माहिती असूनही पाणीपुरवठा विभागाला काही करता येत नाही. जलवाहिनी फुटली की ठेकेदाराच्या मागे लागून जास्तीत जास्त लवकर काम करून घेणे इतकेच सध्या त्यांच्या हाती उरले आहे. जलवाहिनी वरच्या बाजूने फुटली असेल तर दुरुस्ती लवकर होते. मात्र ती खालील बाजूने फुटली तर दुरुस्तीसाठी बराच वेळ लागतो. जुन्या जलवाहिन्या बीडाच्या आहेत. त्यांची जाडी जास्त आहे. त्या दीर्घ काळ टिकतात; मात्र फुटतात त्या वेळी बरेचदा बरोबर खालील बाजूने फुटतात. त्यामुळे दुरुस्ती लवकर होत नाही. या जलवाहिन्यांचा व्यास मोठा असल्यामुळे त्यातून वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाणही मोठे असते.कर्मचाऱ्यांचे आहे लक्षसध्या जलवाहिन्या सातत्याने फुटत आहेत हे खरे आहे. गेल्या काही वर्षांत याचे प्रमाण वाढले, याचे कारण सातत्याने रस्त्यांची कामे होत आहेत. यात खोदकाम झाल्यानंतर जलवाहिनीच्या वर मातीचे व्यवस्थित कव्हर टाकले जात नाही. त्यामुळे त्यावरून थोडे जड वाहन गेले तरी जलवाहिनी फुटते. याशिवाय पाणी वाहिले की भराव खचतो, त्यातून जलवाहिनी अधांतरी राहते व मोडते. हे प्रकार कमी व्हावेत यासाठी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी सातत्याने लक्ष ठेवून असतात. त्याचा उपयोग होतो आहे. - विजय कुलकर्णी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग
जीर्ण जलवाहिन्यांना पाण्याचे अजीर्ण
By admin | Updated: March 19, 2016 02:54 IST