पुणे - सामाजिक कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी १६ वर्षे सशस्त्र सेना विशेषाधिकार कायद्याविरोधात उपोषण करत संघर्ष केला. गांधीवाद विसरत चाललेल्या जगाला सत्याग्रहाची ताकद दाखवून दिली. त्यांचा जीवनसंघर्ष आणि लढा ‘ले मशाले’ या एकल नाट्यातून उलगडत आहे. आजवर या नाट्याचे देशभरात २५०हून अधिक प्रयोग झाले असून, पुण्यातील ओजस सुनीती विनय यांनी हा लढा एकपात्रीतून उभारला आहे. शर्मिला इरोम यांच्या उपस्थितीत हा प्रयोग आज (शुक्रवार) सादर होणार आहे.मानवाधिकार आणि जगावेगळ्या अनोख्या संघर्षाची ही गाथा दक्षिण भारतीय मूळ लेखक सिवीक चंदन यांनी लिहिली. ती भारतभर जावी, या उद्देशाने इंग्रजी आणि हिंदीत लिहून आतापर्यंत २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. या संघषार्तून मणिपूरच्या प्रश्नाकडे बघण्याची भारतीय नागरिक आणि राजकारण्यांना दृष्टी प्राप्त व्हावी अशीच अपेक्षा असल्याचे ओजस यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मणिपूरच्या वेदनेची, महिला अत्याचाराची प्रातिनिधिक शर्मिला आणि तिचा १६ वर्षांचा जीवघेणा संघर्ष या एकपात्रीतून जिवंत होणार आहे. बंगालच्या प्रणव मुखर्जी यांचे मार्गदर्शन, नाट्य कार्यशाळा यातून ओजस यांची नाटकाची आवड दृढ होत गेली. इरोमच्या लढ्यावर मल्याळममध्ये एकपात्री एकांकिका बसवली होती. ओजसने त्याचे रूपांतर ‘ले मशाले’ या प्रयोगात केले. हाच प्रयोग पुण्यात शुक्रवारी सादर होणार आहे.ओजस म्हणाल्या, ‘‘ले मशाले’ च्या माध्यमातून शर्मिला इरोम आणि मणिपुरी स्त्रियांचा लढा उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामधून मणिपुरी लोककथा, संस्कृती, स्त्रियांची ताकद उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विविध पात्रांमधून ही कथा उलगडत जाते.’’हिंदस्वराज’ या पुस्तकाला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केरळ ते इंफाळ अशी शांतीयात्रा काढण्यात आली होती. त्या वेळी सिवीक चंद्र यांचे मल्याळम नाटक उत्तरेमध्ये पोहोचविण्यासाठी विविध भाषांमध्ये त्याचे प्रयोग करण्याची संधी ओजस यांना मिळाली. ]इरोम यांच्या उपोषणाला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नोव्हेंबर २०१० मध्ये पहिल्यांदा ‘ले मशाले’चा प्रयोग केला. तत्पूर्वी ओजस यांनी इरोम यांच्या लढ्याचा बारकाईने अभ्यास केला होता. पुण्यात शिकायला येणाऱ्या मणिपुरी विद्यार्थ्यांकडून खूप काही ऐकायला मिळाले होते.
‘ले मशाले’त इरोमचा लढा, ओजस सुनीती विनय उलगडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:55 IST