वाकड : विरंगुळा आणि हौस म्हणून सुरू केलेली एखादी गोष्ट छंद बनू शकते. मात्र, त्यात सातत्य ठेवणे कठीण आहे. स्वराज्य स्थापना आणि रक्षणासाठी शिवरायांच्या ज्या मावळ्यांनी जीवाचे रान करून असंख्य गड-किल्ले पालथे घातले. हाच वसा वाकड येथील उद्योजक प्रशांत विनोदे यांनी घेत सात वर्षांत तब्बल चारशे गड-किल्ले सर करण्याचा पराक्रम केला आहे.या उपक्रमाबाबत विनोदे यांचा महाराष्ट्र देशा फाउंडेशनतर्फे सन्मानचिन्ह देऊन मगदूम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनोदे यांनी आपला सिंहगडचा ४०० वा ट्रेक त्यांचे दिवंगत वडील दत्तात्रय कोंडिबा विनोदे (नाना) यांना अर्पण केल्याची भावना व्यक्त केली. रामदास काटे, गणेश भुजबळ, संतोष चिंचवडे, वैभव माळी, उत्तम ढेरे, सुनील साठे, ज्ञानदेव हांडे, हेमंत पाडुळे व अरुण बोरकर आदी उपस्थित होते.उद्योजक विनोदे यांनी मित्रांमुळे बलोपासना आणि शारीरिक कसरत म्हणून २०१० मध्ये ट्रेकिंगला सुरुवात केली. आठवड्याला एक या प्रमाणे त्यांनी गड, किल्ले सर करण्याचा सपाटाच लावला. ७ वर्षांमध्ये पुण्यासह महाराष्ट्रातील आणि परराज्यातील असे मिळून एकूण वेगवेगळे ४०० गड-किल्ल्यांवर ट्रेकिंग केले. चारशेवा आकडा पूर्ण करण्यासाठी त्यांनी सिंहगडचा ट्रेक पूर्ण केला. मित्र महेश यादव यांच्या बरोबर सुरू केलेला ट्रेकिंगचा प्रवास आता जीवनाचा एक अविभाज्य छंद बनला असल्याचे विनोदे म्हणाले.विक्रीकर उपायुक्त असणारे मावस भाऊ सुनील काशीद यांच्या सूचनेनंतर राज्यातील बहुतांश गड किल्ले आणि इतर राज्यातील गड किल्ल्यांचे ट्रेकिंग पूर्ण केले. या छंदामुळे दोन वेला अमरनाथ यात्रा पूर्ण केली. विदेशातही प्रवास करताना ट्रेकिंगचा छंद जोपासला, असे विनोदे यांनी सांगितले.आत्तापर्यंत रायगड, तोरणा, हरिश्चंद्रगड, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड, रांगणा, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, राजगड, कोराईगड, रतनगड, वासोटा, हरिहर, पुरंदर, शिवनेरी, चावंड, किल्ले जिंजी, राजगिरी, कृष्णगिरी (तामिळनाडू), वेल्लोरचा किल्ला, प्रतापगड, किल्ले राजमाची- श्रीवर्धन व मनरंजन, प्रतापगड, कोकणातील जंजिरा, किल्ले पद्मदुर्ग, कोलाईचा किल्ला, घनगड, रेवंडचा किल्ला, सिंधुदुर्ग, मल्हारगड या किल्ल्यांच्या ट्रेक बरोबरच कळसुबाई, पन्हाळा-पावन खिंड-विशाळगड, आनंदबन जंगल ट्रेक, राजगड ते तोरणा ट्रेक यासह मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू, उत्तरांचल, केरळ, जम्मू-काश्मीर या राज्यातही भटकंती झाली आहे.
आठ वर्षांत चारशे गड-किल्ले सर, प्रशांत विनोदे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 02:43 IST