पुणे : न्यायपालिका, नोकरशाही, माध्यमे असे स्तंभ खिशात घालण्याचे काम सध्या सुरू आहे. आणीबाणीनंतरचा हा लोकशाहीवरील मोठा हल्ला आहे. ज्यांनी देशासाठी रक्ताचा एक थेंबही सांडला नाही, ते राष्ट्रवादाची भाषा बोलत आहेत. त्यांना हिंदंूचे पाकिस्तान बनवायचे असल्याची कडवट टीका राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सोमवारी येथे केली. एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनतर्फे एस. एम. जोशी सभागृहात आयोजित ‘राष्ट्रनिर्माण और आज का युगधर्म’ या विषयावर ते बोलत होते. ‘आणीबाणी हा देशावरील मोठा हल्ला होता. दिल्लीत तत्कालीन सरकारच्या आशीर्वादाने झालेले शीख हत्याकांड, गुजरातमध्ये २००२ साली झालेली दंगल या घटना देशातील विविधतेवर झालेला हल्लाच होता.सध्याची घटना त्याहून भयंकर आहे. आज न्यायपालिकेचा गळा घोटला जात आहे. त्याचा असंतोष म्हणून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. माध्यमांतील मोठा वर्ग केवळ विरोधकच कसे चुकीचे असे बोलू लागला आहे.आज सरकारच्या बाजूने बातम्या तयार केल्या जात आहेत. इतके करून सरकार म्हणते, आम्ही भ्रष्टाचार कुठे करतो. केंद्रीय अन्वेषण विभाग, लोकपाल, कॅग अशा सर्व संस्थांवर सरकार नियंत्रण ठेवू पाहात असून, लोकपालची अंमलबजावणी केली जात नाही. असे करूनही न्यायमूर्ती लोया प्रकरण, राफेल, पीएनबी अशी प्रकरणे बाहेर येतातच, असे यादव म्हणाले.
देशासाठी रक्त न सांडलेले राष्ट्रवादाची भाषा करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 04:56 IST