नीलेश राऊत-
पुणे : कोरोनाच्या आपत्तीत महापालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम होत असल्याचे चित्र असून, आता बाणेर-बालेवाडी येथे नायडू हॉस्पिटलच्या तोडीचे सहा मजली हॉस्पिटल साकारले जात आहे. कोविड- १९ च्या रुग्णांसाठी या हॉस्पिटलची उभारणी केली जात असली तरी, भविष्यात शहराच्या पश्चिम भागात कमला नेहरू, ससूनच्या धर्तीवर मोठे हॉस्पिटल व्हावे ही या भागातील कित्येक वर्षांची मागणी सदर हॉस्पिटलच्या निमित्ताने पूर्णत्वास येऊ लागली आहे. शहरात कोविड-१९ च्या रुग्णांवर मोफत उपचार व्हावेत, त्यांना एकाच ठिकाणी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड मिळावेत या उद्देशाने सुमारे ८५ कोटी रुपये खर्च करून जम्बो हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली आहे. हे हॉस्पिटल कोरोनाची साथ अथवा लस येईपर्यंत काही महिन्यासाठी कार्यरत राहील. परंतु त्यानंतर लागलीच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणारच किंवा सर्वांना लगेच लस उपलब्ध होईल याचीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत राज्यात प्रथमच पुणे महापालिकेकडून "सीएसआर" मधून एक ४८ हजार स्वेअर फुटाचे हॉस्पिटल शहरात आकारास आले आहे.
५ कोटी खर्च करून झाली हॉस्पिटल निर्मिती.
बालेवाडी सर्व्हे क्र. २०, २१ व बाणेर सर्व्हे क्र. १०९ या मिळकतीमध्ये अकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून, ४ हजार २०० स्वेअर मीटरचे तळमजला व ६ मजले महापालिकेला मिळाले आहेत. यालाच लागून बाजूला 3 एकर जागेत अमेनिटी स्पेसचे आरक्षण आहे. त्यामुळे केवळ ५ कोटी रुपये तेही "सी एस आर" मधून उपलब्ध करून येथे कोविड हॉस्पिटल उभारले जात आहे. ११ ऑगस्ट रोजी या इमारतीत हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू झाले. सुमारे ३०० कामगार आज येथे अहोरात्र काम करीत असून, साधारणतः २८ तारखेला पायाभूत सुविधा व ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, वातानुकूलित यंत्रणा तथा तत्सम सुविधासह ते आरोग्य विभागाकडे सुपूर्त केले जाणार असल्याचे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.--------नायडू हॉस्पिटल नंतर सर्वाधिक जागा असलेला भाग बाणेर बालेवाडी येथे उभारण्यात आलेल्या कोविड हॉस्पिटलची जागा साडेचार एकरची असून, नायडू हॉस्पिटल नंतर पालिकेकडे हॉस्पिटल करीता ताब्यात असलेली ही सध्या तरी ही एकमेव जागा पुण्यात आहे. त्यामुळे पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय उभारणी करताना, नायडू हॉस्पिटल या ठिकाणी काही काळाकरिता हलविण्यात येऊ शकते.--------कोविड हॉस्पिटलचे भविष्यात मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतर : महापौर
शहराच्या पश्चिम भागात ५०० बेडचे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन होते. आज कोरोनाच्या आपत्तीत बाणेर बालेवाडी येथे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. कोरोनाचे संकट संपल्यावर हे हॉस्पिटलच पुढे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रूपांतरित केले जाणार आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.--------