पुणे : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या कुख्यात कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीनिमित्त बाणेर येथील मंदिरात पूजेसाठी परवानगी मिळण्याबाबत केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.महात्मे यांनी हा आदेश दिला आहे. देशपांडे हिने केलेल्या अर्जामध्ये काहीही तथ्य नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रावरून ती एका टोळीची प्रमुख असल्याचे दिसून येत आहे, असा निष्कर्ष नोंदवत न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे (वय ४६, रा. बालाजी निवास, पाषण-सूस रस्ता) हिच्यावर शहरातील डेक्कन, कोथरूड, हिंजवडी, विश्रांतवाडी, चतु:श्रृंगी, हवेली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर संघटीत गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तिला ८ आॅगस्ट २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणात तिचे साथीदार रवि उर्फ प्रदीप रामहरी गवळी ( वय २७, रा. कंदलगाव, मोहोळ, सोलापूर), रवि शिवाजी तपासे ( वय २८) यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. देशपांडेच्या वतीने अॅॅड. विद्याधर कोसे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यात म्हंटले आहे की, तिने २०१४ साली हनुमानाचे मंदिराचे नुतनीकरण केले. तेव्हापासून हनुमान जयंती साजरी करत असून यावेळी महाप्रसादाचा कार्यक्रम असल्याचे नमूद केले आहे. पोलिसांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च देण्याचीही तयारी आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास त्याचा कोणताही दुरुपयोग करणार नसल्याचे अर्जात नमूद क रण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी या अर्जास विरोध केला होता. त्यानुसार न्यायालायने हा अर्ज फेटाळला.
कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीनिमित्त केलेला पूजेचा अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 8:17 PM
हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणा-या कुख्यात कल्याणी देशपांडेनी हनुमान जयंतीनिमित्त बाणेर येथील मंदिरात पूजेसाठी परवानगी मिळण्याबाबत केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
ठळक मुद्देपोलिसांच्या सुरक्षेसाठी येणारा खर्च देण्याचीही तयारी अर्जात नमूद